डॉल्बी दुकानदारांनाही पोलिसांचा दणका

By Admin | Updated: August 9, 2016 01:12 IST2016-08-09T01:07:55+5:302016-08-09T01:12:30+5:30

मालकांवर गुन्हा : टेंबे रोडवर ५० हजारांचे साहित्य जप्त

Dolby shopkeepers get a police bump | डॉल्बी दुकानदारांनाही पोलिसांचा दणका

डॉल्बी दुकानदारांनाही पोलिसांचा दणका

कोल्हापूर : येथील टेंबे रोडवरील दोन डॉल्बी दुकान मालकांवर ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत रविवारी (दि. ७) गुन्हा दाखल केला. या दुकानातील डॉल्बी मशीन, मिक्सर साहित्य असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अरविंद इलेक्ट्रॉनिक्स व गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स अशी या डॉल्बी तयार करून विकणाऱ्या दुकानांची नावे आहेत.
याप्रकरणी संशयित दुकानमालक हिमांशू अरविंद धडाम (वय २९, रा. १४७६ बी वॉर्ड, काळकाई गल्ली, शिवाजी पेठ), सागर नारायण गुणाजी (४२ , रा. प्लॉट नंबर ८९, मंगेशकरनगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीविरहित करण्याचे पोलिस प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्याचाच भाग म्हणून गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई सुरू आहे. त्याचवेळेला आता पोलिसांची नजर थेट डॉल्बी तयार करणाऱ्या दुकानादारांकडेही वळली आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘टेंबे रोडवर शिवाजी स्टेडियमच्या गाळ्यात डॉल्बी साऊंड सिस्टीम विक्रेत्यांची दुकाने आहेत. या दुकानामध्ये खरेदी करण्यास येणाऱ्या ग्राहकांना साऊंड सिस्टीमची चाचणी देताना मोठ्याने आवाज करून दाखविला जातो. त्यामुळे दुकानाच्या समोरील रस्त्यावर ये-जा करणारे व परिसरातील नागरिकांना डॉल्बीच्या आवाजाचा त्रास होतो. यासंबंधी पोलिसांनी ८ जुलैला या विक्रेत्यांची पोलिस ठाण्यात बैठक घेऊन ध्वनिप्रदूषण कायद्याबाबत माहिती दिली होती. ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
शनिवारी टेंबे रोडवरील अरविंद व गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानामध्ये मोठ्या आवाजने डॉल्बी लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दोन दुकानातील आवाजाची डेसिबल मशीनच्या साहाय्याने खात्री केली. त्यावेळी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. म्हणून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले.

इचलकरंजीत चौघांवर गुन्हा
इचलकरंजी : विणकर दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत डॉल्बी लावल्याप्रकरणी शिवाजीनगर आणि गावभाग पोलिसांनी डॉल्बी मालकासह चौघांवर सोमवारी गुन्हा दाखल केला. या चौघांना न्यायालयाने एकूण २३ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सुनील विलास मेटे (वय ४०), अभिषेक राजेंद्र पेटकर (२३, रा. गावभाग), दीपक अशोक वाघमोडे (रा. आमराई मळा) व डॉल्बीमालक सुभाष तुकाराम बुचडे (४३, रा. गांधी कॅम्प) अशी चौघांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, एस.बी.सी. संघर्ष समितीच्यावतीने रविवारी विणकर दिनानिमित्त छत्रपती शाहू पुतळा ते गांधी पुतळा
या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली
नव्हती. तसेच मिरवणुकीत
डॉल्बीही लावण्यात आला
होता. त्यामुळे वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने प्रत्येकी ३७५० व २००० असा दंड ठोठावला आहे. हा एकूण दंड २३ हजार रुपये होतो. तसेच यापुढेही विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघन करून डॉल्बी लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे
पोलिस निरीक्षक मनोहर
रानमाळे व सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)

Web Title: Dolby shopkeepers get a police bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.