विसर्जन मिरवणुकीत नियमात ‘डॉल्बी’

By Admin | Updated: September 9, 2016 01:12 IST2016-09-09T01:00:28+5:302016-09-09T01:12:27+5:30

व्यावसायिकांची धरणे : नियमाचे बंधन मान्य; पूर्णपणे बंदीला विरोध

DOLBY 'rules out for immersion procession | विसर्जन मिरवणुकीत नियमात ‘डॉल्बी’

विसर्जन मिरवणुकीत नियमात ‘डॉल्बी’

कोल्हापूर : गणेशोत्सवात नियमात राहून डॉल्बी वाजविण्याला परवानगी द्यावी, या मागणीसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्हा साउंड असोसिएशनने पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गणेशोत्सवात दि. ९, १०, १५ सप्टेंबर या तीन दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत, तर इतर दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत दोन बेस आणि दोन टॉप, ६० डेसिबल आवाज मर्यादेपर्यंत नियमात राहून डॉल्बी वाजविण्यास परवानगी देण्यात आली.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात उच्च न्यायालयाने ‘डॉल्बी’ वाजविण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांनी ‘डॉल्बी’ला पूर्णत: बंदी घातली. यावर जिल्हा साउंड असोसिएशनने आक्षेप घेत गुरुवारी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयासमोर दुपारनंतर धरणे आंदोलन केले. शहर पोलिस उपअधीक्षक भारत राणे यांनी त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; पण उच्च न्यायालयाच्या नियमात राहून ‘डॉल्बी’ला परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनने केली.
सायंकाळी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी नियमात राहून डॉल्बी लावण्यास परवानगी दिली. मात्र, आवाजाचे व वेळेचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश दिले. शिवाय याबाबतचा आदेश सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेस यंत्रणेवरून कळविण्यात आला. या शिष्टमंडळात जिल्हा साउंड असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर मुल्ला, विजय वरुटे, शब्बीर पटेल, सरदार पाटील, संजय नलवडे, सागर गवळी, प्रदीप गायकवाड, आदी साउंड व्यावसायिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


दि. ९, १० आणि १५ सप्टेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत, तर इतर दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी
दोन टॉप, दोन बेस लावण्यास परवानगी
६० डेसिबलपर्यंत साउंड मर्यादा
नियम तोडणाऱ्यांवर तातडीने कारवाई

Web Title: DOLBY 'rules out for immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.