यंदा डॉल्बी नाय!
By Admin | Updated: September 2, 2015 00:02 IST2015-09-02T00:02:45+5:302015-09-02T00:02:45+5:30
गणेशोत्सव : ३० मंडळांचा डॉल्बी न लावण्याचा निर्धार

यंदा डॉल्बी नाय!
कोल्हापूर : डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या प्रयत्नांना ‘पीटीएम’सह शहरातील ३० पेक्षा जास्त तरुण मंडळांनी पाठबळ दिले आहे. हा आदर्श घेऊन अन्य तालीम, तरुण मंडळे, राजकीय-सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केले आहे.
अवघ्या पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात डॉल्बीच्या दणदणाटाचा अतिरेक होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. शर्मा यांनी पोलीस उपअधीक्षकांना पोलीस ठाण्यांतर्गत मंडळांच्या बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यंदाही डॉल्बीचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांच्या पोस्टर्सचे वाटप करण्यात येणार आहे तसेच तरुण मंडळांच्या सामूहिक बैठकीत पोलीस भूमिका स्पष्ट करून मार्गदर्शन करणार आहेत. कायद्यानुसार कारवाई डॉल्बीचा वापर करतील त्यांचेवर व डॉल्बी पुरविणारे चालक, मालक, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व ज्या वाहनांवर डॉल्बी यंत्रणा ठेवण्यात आली आहे त्या वाहनाचे चालक, मालक आदींवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच वर्षे कारावासाची शिक्षा व १ लाख रुपये दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.अश्लील गाण्यांसह देखाव्यांवर बंदी ‘श्रीं’च्या स्वागत व विसर्जन मिरवणुकीत प्रबोधनात्मक देखावे असावेत, कोणत्याही मंडळाने अश्लील, हिडीस प्रकारची गाणी लावल्यास कॅसेट, सीडी जप्त केल्या जातील. मिरवणुकीमध्ये मंडळाच्या स्वयंसेवकांनी आपल्या मंडळाचे कार्यकर्ते दारू पिऊन किंवा मादक द्रव्य घेऊन येणार नाहीत, मंडळाबाहेरील कोणतीही व्यक्ती सहभागी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी.परत्येक चौकात ब्रेथ अॅनालायझरचा वापर करण्यात येणार असून, दारू पिऊन अथवा मादक द्रव्य घेऊन येणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
डॉल्बीमुक्त तरुण मंडळे
तुकाराम माळी मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ (सर्व मंगळवार पेठ), न्यू अमर तरुण मंडळ, एस. पी. बॉईज, अष्टविनायक ग्रुप, रणझुंजार तरुण मंडळ, मृत्युंजय मित्र मंडळ (सर्व शनिवार पेठ), ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ (शुक्रवार पेठ), संघर्ष मित्र मंडळ (आंबे गल्ली, कसबा बावडा), शाहूपुरी युवक मंडळ (व्यापारी पेठ शाहूपुरी), जयभवानी तालीम मंडळ (माळी गल्ली, कसबा बावडा), नंदी तरुण मंडळ (रंकाळा चौक), छ. शिवाजीराजे तरुण मंडळ (पाटील गल्ली, कसबा बावडा), मित्रप्रेम तरुण मंडळ (ताराबाई रोड), उमेश कांदेकर युवा मंच (रंकाळा टॉवर), मनोरंजन तरुण मंडळ (वाडकर गल्ली, कसबा बावडा), प्रिन्स क्लब (मंगळवार पेठ), सम्राट मित्र मंडळ (चव्हाण गल्ली, कसबा बावडा), जय शिवराय तरुण मंडळ (उद्यमनगर), सर्वोदय मित्र मंडळ (रविवार पेठ), युवक मित्र मंडळ (राजारामपुरी ११ वी गल्ली), शिपुगडे तालीम मंडळ (जुना बुधवार पेठ), सोल्जर्स ग्रुप (तोरस्कर चौक).
गणराया अवॉर्ड कार्यक्रमामध्ये शहरातील ३० पेक्षा जास्त तालीम व गणेश तरुण मंडळांनी यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. अन्य तालीम व तरुण मंडळांच्या बैठका घेऊन त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेणार आहे.
- भारतकुमार राणे,
शहर पोलीस उपअधीक्षक