नगरपालिका सभेत ‘डॉल्बी’चा गोंधळ
By Admin | Updated: August 12, 2014 00:39 IST2014-08-11T23:54:35+5:302014-08-12T00:39:30+5:30
इचलकरंजीचे राजकारण : सत्तारूढ कॉँग्रेस व विरोधी ‘शविआ’मध्ये खडाजंगी

नगरपालिका सभेत ‘डॉल्बी’चा गोंधळ
इचलकरंजी : गणेशोत्सवामध्ये डॉल्बी लावण्याबाबत सत्तारूढ कॉँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी, असा आग्रह विरोधी शहर विकास आघाडीने धरल्यामुळे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अशा गोंधळातच नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याची घोषणा केली आणि सभा संपुष्टात आली.
नगरपालिकेच्या सभागृहामध्ये विविध प्रकारच्या १४ विषयांवर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षा बिरंजे यांनी आज, सोमवारी सभा आयोजित केली होती; पण सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी, ऐनवेळच्या विषयाची पत्रिका सभा सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी मिळणे आवश्यक आहे. परिणामी, सभेसमोर ऐनवेळचे विषय ठेवू नयेत, असा आक्षेप घेतला. मात्र, ऐनवेळचे विषय नागरी हिताचे असल्याने सभेसमोर ठेवण्यात आले आहेत, अशा नगराध्यक्षा बिरंजे यांनी दिलेल्या उत्तराने चोपडे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी या विषयांना आक्षेप घेतला आणि गोंधळास सुरुवात झाली.
सत्तारूढ व विरोधी बाजूचे नगरसेवक एकाच वेळी बोलत असताना शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी गणेशोत्सवामध्ये डॉल्बी लावण्याचा विषय ऐरणीवर आणला. सत्तारूढ कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते व उपनगराध्यक्ष रणजित जाधव हे गणेशोत्सवामध्ये डॉल्बी लावण्याच्या समर्थनार्थ झालेल्या बैठकीस उपस्थित होते, तर त्यापाठोपाठ पोलिसांनी डॉल्बीच्या विरोधात घेतलेल्या बैठकीतसुद्धा गटनेते कलागते यांनी हजेरी लावली. याचा परिणाम म्हणून गणेशोत्सवावेळी डॉल्बी लावण्याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. म्हणून हा विषय ऐनवेळच्या विषयात घेऊन यावर चर्चा व्हावी, असा आग्रह जाधव यांनी धरला. तेव्हा जाधव यांच्या विषयास सत्तारूढ कॉँग्रेस नगरसेवकांनी विरोध केला. तो पाहून शहर विकास आघाडीचे सर्वच नगरसेवक उठून एकाचवेळी बोलू लागले. त्याला प्रत्युत्तर म्हणून कॉँग्रेसचे नगरसेवकही उठले. असा गोंधळ सुरू असतानाच विषयपत्रिकेचे वाचन करून नगराध्यक्षा बिरंजे यांनी सभा संपवल्याचे जाहीर केले.
सभेच्या सुरुवातीला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये यश मिळविणारे खेळाडू ओंकार ओतारी, गणेश माळी, चंद्रकांत माळी व राही सरनोबत यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच येळ्ळूर येथे मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा निषेध झाला.