शेतकऱ्यांच्या सवलतीच्या साखरेवरही ‘जीएसटी’ कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:47 IST2017-07-18T00:47:28+5:302017-07-18T00:47:28+5:30
कारखानदार संभ्रमात : साखर कारखान्यांना करावी लागणार कसरत

शेतकऱ्यांच्या सवलतीच्या साखरेवरही ‘जीएसटी’ कर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : सहकारी तत्त्वावर असणारे साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना सवलतीच्या दरात साखर देतात. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार तीन रुपयांपासून अगदी १५ रुपयेप्रमाणे प्रतिकिलो ऊस उत्पादक सभासदांना सवलतीच्या दरात साखर देतात; पण जीएसटीच्या कराची अंमलबजावणी झाल्यापासून हा कर कोणी भरावा याबाबत चर्चा सुरू असून, सवलतीच्या साखरेवर गंडांतर येणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्रात १९६० नंतर सहकारी साखर कारखानदारीची झपाट्याने वाढ झाली. या उद्योगाची उभारणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी समोर ठेवून सहकार सम्राटांनी आपली धोरणे राबविली. अगदी सहकारी साखर कारखाने स्थापनेपासून शेतकऱ्यांना
अनेक सवलती देऊन ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित केले. यातूनच या उद्योगातून निर्माण होणाऱ्या साखरेचाही ऊस उत्पादक शेतकरी हक्कदार असून, त्याला बाजारभावापेक्षा कमी दरात साखर देण्याचा कारखान्यांकडून स्तुत्य निर्णय घेतला होता. हा पायंडा आजही साखर कारखानदारांनी कायम ठेवला आहे. मात्र, या सवलतीच्या दरावर जीएसटी भरावी लागणार की बाजारपेठेत असणाऱ्या साखर दरावर भरायचा याबाबत निर्देश नसल्याने याबाबत गाईडलाईन कोणाकडून घ्यावयाचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जीएसटीपूर्वी जरी ही साखर सवलतीने दिली, तरीही साखरेवर अबकारी कराच्या रूपाने प्रति क्विंटल १९५ रुपये भरावी लागत. मात्र, जीएसटी आकारला जात असल्याने सवलतीच्या साखर विक्री किमतीवरच जीएसटी घेणार की बाजारपेठेतील किमतीवर याचा गोंधळ निर्माण झाल्याने सवलतीची साखर देणे बंद केल्याने वादाचे प्रसंग होत आहेत.
सवलतीच्या साखरेवर गंडांतर येऊ नये
१ सरळ जीएसटी कर प्रणाली आल्याने आणि साखरेवर ५ टक्के जीएसटीमध्ये कर लावल्याने तो भरायचा कोणी यावर उलट-सुलट चर्चा सुरू असून, सवलतीच्या साखरेवर गंडांतर येऊ नये अशी माफक आशा ऊस उत्पादकांतून व्यक्त होत आहे.
२ सध्या कुंभी कासारी ३ रुपये, वारणा २ रुपये, हमीदवाडा ७ रुपये, शाहू १२ रुपये, जवाहर ५ रुपये, राजाराम क। बावडा ५ रुपये, संताजी घोरपडे ११ ते १६ रुपये, विश्वास ५ रुपये प्रति किलो अशी सवलतीच्या दरात साखर शेतकऱ्यांना दिली जाते.