दोडामार्गचे संरक्षण २८ पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 20:54 IST2015-07-16T20:54:32+5:302015-07-16T20:54:32+5:30

शहरही बीट अंमलदार विनाच : अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत

Doda road protection 28 police custody | दोडामार्गचे संरक्षण २८ पोलिसांच्या हाती

दोडामार्गचे संरक्षण २८ पोलिसांच्या हाती

वैभव साळकर - दोडामार्ग -‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन आॅन ड्युटी २४ तास जनतेच्या सेवेसाठी हजर असलेल्या दोडामार्ग पोलीस ठाण्यात केवळ २८ एवढ्या अपुऱ्या कर्मचारी वर्गावर अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुंभवडेपासून ते तेरवणपर्यंत आणि मांगेली-विर्डीपासून ते मोरगावपर्यंत तालुक्यातील ५७ गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलिसांची दमछाक होत आहे. एका-एका कर्मचाऱ्याकडे तीन-तीन विभागांचे काम असल्याने कर्मचाऱ्यांना कमालीचा मानसिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कर्मचारीदेखील तणावमुक्त रहावेत, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची आवश्यकता आहे.
दोडामार्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवा तालुका. २६ जून १९९८ रोजी तालुक्याची निर्मिती झाली; परंतु तालुका निर्मितीनंतर सलग दहा वर्षे येथील कायदा व सुव्यवस्थेचे काम सावंतवाडी तालुक्यातील बांदा पोलीस ठाण्यातूनच पाहिले जात होते. दोडामार्ग, कळणे आणि कोनाळकट्टा अशी तीन पोलीस दूरक्षेत्रे त्यावेळी कार्यरत होती. सन २००२ ते २००८ पर्यंतच्या काळात तालुक्यात परप्रांतीयांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आणि गुन्हेगारीचे प्रमाणही याच दरम्यान कमालीचे वाढले. खून, आत्महत्या, संशयास्पदरीत्या बेवारस मृतदेह सापडण्याचे प्रकारदेखील वाढले. आधीच भौगोलिकदृष्ट्या गावे विखुरलेली असल्याने कमीत कमी वेळेत गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस कुमक पोहोचण्यात अनेक अडचणी येऊ लागल्या.
याच काळात तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील जमिनीत गांजा लागवडीचे प्रकार उघडकीस आले. परिणामत: वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्गसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, ही मागणी जोर धरू लागली. त्यावेळी शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून अल्पावधीत जिल्ह्यात प्रसिद्ध झालेले मल्लिकार्जुन प्रसन्ना हे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात दोडामार्गसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय चांगलाच गाजला. इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रसन्ना यांची भेट घेऊन स्वतंत्र पोलीस ठाण्याबाबत आवश्यकता पटवून दिल्यानंतर दोडामार्गवासीयांना पोलीस ठाणे देण्याचे मान्य झाले. मात्र, त्याच दरम्यान त्यांची बदली झाली अन् रवींद्र शिसवे हे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या कारकिर्दीतच १ जानेवारी २००९ रोजी दोडामार्गसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करून रीतसर उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला नंदकुमार देशमुख हे पोलीस निरीक्षक म्हणून दोडामार्ग पोलीस ठाण्याचा कार्यभार हाकू लागले. त्यावेळी त्यांना केवळ एक सहायक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक व फक्त ३६ कर्मचारी देण्यात आले. या ३६ कर्मचाऱ्यांवरच पोलीस ठाण्याचा डोलारा उभा होता. मात्र, जे कर्मचारी उपलब्ध होते ती संख्या पुरेशी नव्हती.
सन २००९ नंतर आज सहा वर्षे पोलीस ठाणे मंजूर होऊन झाली; परंतु या सहा वर्षांत इथली कर्मचारी संख्या वाढलेली नाही. उलट कमीच झाली. सहा वर्षांच्या काळात पाच पोलीस निरीक्षक बदलले; परंतु या पाचही अधिकाऱ्यांना केवळ तुटपुंजा कर्मचारी वर्ग घेऊनच तालुका आणि कायदा सुव्यवस्था पाहण्याची वेळ आली.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी तालुकावासीयांमधून केली जात आहे.

दोडामार्ग पोलीस ठाण्यात २८ पोलीस कर्मचारीच
सध्या दोडामार्ग पोलीस ठाण्यासाठी ४० ते ४५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे; परंतु सद्य:स्थितीत केवळ २८ पोलीस कर्मचारीच दोडामार्ग पोलीस ठाण्यात आहेत. तर दोघेजण सावंतवाडी उपविभागीय पोलीस ठाण्यात संलग्न आहेत. त्यामुळे २६ कर्मचारीच खरे तर मूर्त स्वरुपात कार्यरत आहेत. याठिकाणी सहायक पोलीस उपनिरीक्षक पदे दोन असून, त्यापैकी एकच कार्यरत आहे, तर एकजण सावंतवाडी येथे संलग्न आहे. हवालदार म्हणून पाच कर्मचारी कार्यरत असून, कळणे पोलीस दूरक्षेत्रावर दोन, कोनाळकट्टा पोलीस दूरक्षेत्रावर दोन व विजघर या ठिकाणी दोन कर्मचारी कार्यरत आहेत. मुळात विजघर चेकनाक्यावर एकूण तीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, या ठिकाणी कर्मचारी संख्या अपुरी असल्याने फक्त दोनच कर्मचारी देण्यात आले आहेत. एकाच कर्मचाऱ्यावर बीट अंमलदार, तंटामुक्ती अशा दोन-दोन विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण पडत असून, त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावरही जाणवत आहे.

दोडामार्ग शहर बीट अंमलदाराविना?
दोडामार्ग पोलीस ठाण्यातील खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या दोडामार्ग शहरासाठी सध्या बीट अंमलदारच नाही. त्यामुळे गैरसोय होत असून, शहराचा अतिरिक्त कारभार प्रभारी बीट अंमलदाराकडे सोपविण्यात आला आहे.

Web Title: Doda road protection 28 police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.