‘साई मल्टीस्पेशालिटी’ ची कागदपत्रे मनपाकडून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST2021-05-20T04:24:39+5:302021-05-20T04:24:39+5:30
कोल्हापूर : व्हिनस कॉर्नर येथील लोटस प्लाझा अपार्टमेंटमध्ये कोविड सेंटर चालविणाऱ्या साई होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विरुद्धच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवरून ...

‘साई मल्टीस्पेशालिटी’ ची कागदपत्रे मनपाकडून ताब्यात
कोल्हापूर : व्हिनस कॉर्नर येथील लोटस प्लाझा अपार्टमेंटमध्ये कोविड सेंटर चालविणाऱ्या साई होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विरुद्धच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवरून या हॉस्पिटलची दाखल रुग्णांबाबतची सर्व कागदपत्रे बुधवारी महानगरपालिकेने ताब्यात घेतली.
गेले महिनाभर वादग्रस्त हॉस्पिटलमध्ये विनापरवाना कोविड पेशंट दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात सुमारे ४० रुग्ण दगावले असून त्यांचे मृतदेह परस्पर नातेवाइकांच्या ताब्यात दिले. तसेच हॉस्पिटलमध्ये कुठलीही कोविड प्रतिबंधक उपाययोजना अवलंबली जात नसल्याबाबत इमारतीतील सर्व मिळकतधारक, परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे दि. १ मे रोजी लेखी तक्रार केली होती.
भाजपाचे शाहूपुरी मंडल अध्यक्ष आशिष कपडेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेने दोन डॉक्टर्सची चौकशी समिती नेमली असून या समितीने नुकतीच या वादग्रस्त हॉस्पिटलची रुग्णासंबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
हॉस्पिटलने केलेल्या रुग्णांच्या लुबाडणुकीबाबतही असेलेल्या तक्रारींची शहानिशा करून लवकरच त्याविरुद्ध पोलीस प्रशासनाकडे लवकरच तक्रार करण्यात येईल, असे कपडेकर यांनी सांगितले.