डॉक्टरप्रश्नी राधानगरी सभापतींचा आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: January 20, 2015 23:36 IST2015-01-20T22:03:42+5:302015-01-20T23:36:03+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन : ३० जानेवारीपर्यंत मुदत; रिक्त जागा भरा

डॉक्टरप्रश्नी राधानगरी सभापतींचा आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयुर्वेदिक दवाखान्यांतील रिक्त जागा ३० जानेवारीपर्यंत भराव्यात, अन्यथा नाइलाजास्तव आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, अशा इशाऱ्याचे निवेदन सभापती रूपालीदेवी धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन काल, सोमवारी दिले.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात राधानगरी डोंगराळ तालुका आहे. तालुक्यातील धामोड, राशिवडे, सरवडे, ठिकपुर्ली, वाळवा, तुरंबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. याशिवाय असंडोली आणि आणाजे आयुर्वेदिक दवाखान्यांत प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तालुक्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडून पडली आहे. दुर्गम खेड्यांतील प्रसूती परिस्थितीमधील महिला आणि वृद्ध रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. कोल्हापुरातील दवाखान्यांत उपचारासाठी यावे लागत आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर सुभेदार म्हणाले, रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्याचा निर्णय शासकीय धोरणांशी निगडित आहे. प्रतिनियुक्तीचे अधिकारही मला नाहीत. रिक्त जागा भराव्यात यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. पत्रव्यवहार केले आहेत. मला डॉक्टर नियुक्तीचे अधिकार नाहीत. त्यामुळे रिक्त जागांवर मी कसा वैद्यकीय अधिकारी देऊ ?निवेदन देताना उपसभापती सुप्रिया साळोखे, सदस्या कविता पाटील, वंदना पाटील, प्रल्हाद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पोवार, जयसिंग खामकर, विनायक देसाई, जोतिराम कांबळे, शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते.