सीपीआरच्या विकासासाठी डॉक्टरांनी सहभागी व्हावे
By Admin | Updated: November 30, 2015 01:07 IST2015-11-30T00:46:52+5:302015-11-30T01:07:07+5:30
जयप्रकाश रामानंद : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची परिषद

सीपीआरच्या विकासासाठी डॉक्टरांनी सहभागी व्हावे
सीपीआरच्या विकासासाठी डॉक्टरांनी सहभागी व्हावे
जयप्रकाश रामानंद : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची परिषद
कोल्हापूर : सीपीआर ही राष्ट्रीय संपत्तीतून उभारलेली संस्था असून सर्वसामान्य रुग्णांचा आधार आहे. त्यामुळे सीपीआर जिवंत ठेवण्यासह त्याच्या विकासासाठी कोल्हापूरकरांनी लक्ष द्यावे तसेच त्यात शासकीय, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनीदेखील सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन राजर्र्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे रविवारी आयोजित केएमए कॉन २०१५ या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘औषधशास्त्रातील नवीन घडामोडी, त्याची उपयोगिता’ असा परिषदेचा विषय होता. प्रभारी अधिष्ठाता डॉ. रामानंद म्हणाले, कोल्हापुरातील वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआरचा आवश्यक त्या प्रमाणात विकास झालेला नाही, हे शासकीय मर्यादांचे एक उदाहरण आहे. सध्या शासकीय आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रात दरी दिसून येते. ही दरी मिटवून या दोन्ही क्षेत्रांनी काही बाबतीत एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. सामाजिक बांधीलकीतून सीपीआर, वैद्यकीय महाविद्यालयासाठी कार्यरत राहावे. या संस्थांच्या विकासासाठी मार्गदर्शन, सूचनांच्या माध्यमातून पाठबळ द्यावे.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘केएमए फ्लॅश’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. डॉ. अल्पना चौगुले यांनी रेखाटलेले शिवराज्याभिषेकाचे चित्र असोसिएशनला भेट दिले. यावेळी सहसचिव आर. एम. कुलकर्णी, प्रकाश पाटील, प्रविण हेंद्रे, राजकुमार पाटील, रविंद्र शिंदे, हणमंत पाटील, जयंत वाटवे, आनंद कामत, अजित लोकरे, संदीप पाटील, गिरीश कोरे, जे. के. पाटील, विवेकानंद कुलकर्णी, राजेंद्र वायचळ, सुनील कुबेर, सोपान चौगुले आदी उपस्थित होते. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पी. एम. चौगुले यांनी स्वागत केले. किरण दोशी यांनी परिषदेच्या विषयाची माहिती दिली. अमर आडके यांनी सूत्रसंचालन केले.
कोल्हापूर विभागीय केंद्रासाठी प्रयत्न
नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आहे. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करणे, कार्यालयीन काम आदी विविध अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी कोल्हापुरात विभागीय केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.