‘त्या’ डॉक्टरची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: January 11, 2016 01:09 IST2016-01-11T00:52:21+5:302016-01-11T01:09:42+5:30
अश्लील चित्रफीत : दोषारोपपत्र सादर

‘त्या’ डॉक्टरची कारागृहात रवानगी
कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचे मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण (क्लिप) व छायाचित्रे काढल्याप्रकरणी डॉक्टर फणीकुमार किरण कोटा (वय ३१, रा. गंगारेड्डी, तेलंगणा) याला शनिवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची बिंदू चौक कारागृहात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी तपास पूर्ण करून डॉ. कोटा याच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक मनीषा गभाले यांनी रविवारी दिली.
गुरुवारी (दि. ७) ड्युटी संपवून आल्यानंतर संबंधित महिला डॉक्टर आपल्या रूममध्ये कॉटवर विश्रांती घेत असताना चोरून मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण (क्लिप) व छायाचित्रे काढल्याचे आढळून आले. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने डॉ. फणीकुमार याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ त्याच्या मुसक्या आवळत मोबाईल जप्त केला. यावेळी त्याची तपासणी केली असता पीडित डॉक्टर महिलेची झोपलेल्या अवस्थेतील छायाचित्रे व व्हिडिओ क्लिप आढळली. त्यानुसार त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची बिंदू चौक कारागृहात रवानगी करण्यात आली.
कोटा याला काढून टाकण्याची प्रक्रिया
संशयित आरोपी फणीकुमार कोटा हा जिल्हा रुग्णालयात (सीपीआर) प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहे. त्याच्या या कृत्याबद्दल पीडित महिला डॉक्टरने महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार डॉ. कोटा याला नोकरीवरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.