दलाली मागणाऱ्या डॉक्टरला पकडले
By Admin | Updated: November 28, 2014 00:06 IST2014-11-27T23:32:56+5:302014-11-28T00:06:54+5:30
‘रेफरल चार्जेस’साठी कायपण!

दलाली मागणाऱ्या डॉक्टरला पकडले
सातारा : उपचारासाठी रुग्णाला दाखल केल्यानंतर खासगी डॉक्टरांकडे दलाली मागणाऱ्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सुधाकर रामकृष्ण भंडारे (वय ४२) असे डॉक्टराचे नाव असून, भुर्इंज येथे आज, गुरूवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत भुर्इंज प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्कलीन रुग्णवाहिका वैद्यकीय सेवेसाठी डॉ. सुधाकर भंडारे काम करीत होता. दि. २३ रोजी डॉ. भंडारेने १०८ या ‘टोल-फ्री’ सेवा असणाऱ्या रुग्णवाहिकेतून एक रुग्ण वाईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला. त्यानंतर भंडारेने कमिशन (रेफरल चार्जेस) म्हणून एकूण वैद्यकीय बिलाच्या १५ टक्क्यांप्रमाणे १३ हजार ५०० रुपये लाचेची मागणी खासगी डॉक्टरकडे केली. खासगी डॉक्टरने याबाबत सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी दुपारच्या सुमारास डॉ. भंडारेला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
भुर्इंज, ता. वाई येथील सदगुरूकृपा हॉस्पिटल या डॉ. भंडारेच्या खासगी रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
रेफरल चार्जेस’साठी कायपण!
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार शासनाच्या तत्काळ वैद्यकीय रुग्णसेवेतील काही डॉक्टर रुग्णाला रुग्णवाहिकेत घेतल्यानंतर तत्काळ तीन ते चार खासगी रुग्णालयांशी संपर्क साधतात. जास्तीत जास्त ‘रेफरल चार्जेस’ची आॅफर मिळेपर्यंत रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याला तसेच ताटकळत ठेवतात.