डॉक्टर दाम्पत्याचा खून चोरीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:08+5:302016-01-02T08:34:46+5:30
पोलिसांची माहिती : इस्लामपुरातील आणखी एक अल्पवयीन ताब्यात

डॉक्टर दाम्पत्याचा खून चोरीसाठी
सांगली : इस्लामपूर येथील डॉ. प्रकाश कुलकर्णी व अरुणा कुलकर्णी या दाम्पत्याचा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी शुक्रवारी दिली. याप्रकरणी एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. तपास सुरू असून, जी माहिती निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही घनवट यांनी सांगितले.इस्लामपूर येथे पंधरवड्यापूर्वी कुलकर्णी दाम्पत्याचा घरात घुसून निर्घृण खून करण्यात आला होता. या दुहेरी खुनाचा छडा लावणे आव्हान होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण व इस्लामपूर पोलिसांनी संयुक्तपणे तपास करून गेल्या आठवड्यातच याचा छडा लावला. या प्रकरणी कुलकर्णी यांच्या रुग्णालयातील मदतनीस सीमा यादव, तिचा प्रियकर नीलेश दिवाणजी व मित्र अर्जुन पवार (तिघे रा. इस्लामपूर) यांना अटक केली होती. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेदिवशी कुलकर्णी यांच्या घरातील पर्स, रोख रक्कम, मोबाईल व एटीएम कार्ड लंपास झाले आहे. त्यामुळे हा दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने केल्याचे निष्पन्न झाले असल्याचे घनवट यांनी सांगितले.
दरम्यान, खून का केला, कसा केला, कट कुठे रचला, नेमके कारण काय आहे, याविषयी माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. तपास अजूनही सुरू आहे. अनेक संशयितांची चौकशी सुरू असून, त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
न्यायालयात नेणार
अटकेतील सीमा यादव, नीलेश दिवाणजी व अर्जुन पवार या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज, शनिवारी संपणार आहे. पोलीस कोठडीची मुदत वाढवून घेण्यासाठी त्यांना दुपारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन संशयितासही न्यायालयात उभे केले जाणार आहे.