रुकडी येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजकुमार पाटील यांनी दारूच्या नशेत विनयभंग करून लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केल्यामुळे पीडित महिलेने हातकणंगले पोलीस ठाण्या मध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन डॉ. पाटील यांना इचलकरंजी येथिल प्रथमवर्ग न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रुकडी येथील पीडित महिला आपल्या सासूबरोबर नियमित तपासणीसाठी गावातील श्री हॉस्पिटलचे डॉ.राजकुमार पाटील यांच्याकडे शुक्रवारी रात्री ९ वा. गेली असता आरोपी डॉक्टर पाटील यांनी दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग केला. संबंधित माहिला आणि सासू यांनी झाला प्रकार घरी सांगितला असता पती, सासरा यांच्यासह पीडित महिलेने हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. डॉ. पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री १ वा. त्याला ताब्यात घेऊन हातकणंगले ग्रामीण रुग्णालयामध्ये मेडिकल तपासणी केली. शनिवारी डॉ. पाटील यांना इचलकरंजी येथील प्रथमवर्ग न्यायालया समोर हजर केले असता त्यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने करत आहेत.