कौशल्य मिळवायचे की, पोपटपंची करायची ?
By Admin | Updated: December 9, 2014 23:51 IST2014-12-09T23:33:39+5:302014-12-09T23:51:49+5:30
‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांपुढे पेच : नकारात्मक गुणपद्धती त्रासदायक; विद्यार्थ्यांचा मोर्चा काढून विरोध

कौशल्य मिळवायचे की, पोपटपंची करायची ?
संतोष मिठारी - कोल्हापूर -आयएएस, उपजिल्हाधिकारी, आदी अधिकारी पदांसाठी होणाऱ्या परीक्षांप्रमाणे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) नकारात्मक गुणपद्धती लागू केली. मात्र, अधिकतर प्रात्यक्षिकांद्वारेच शिक्षण-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ती त्रासदायक ठरत आहे. गेल्यावर्षी घेतलेल्या आयटीआयच्या परीक्षांचा निकाल दोन ते दहा टक्के लागला आहे. प्राचार्य, शिक्षकांनादेखील ही पद्धती नको आहे.
स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग-व्यवसायातील कौशल्य मिळवायचे की, लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी निव्वळ पोपटपंची करायची, असा प्रश्न राज्यातील सुमारे ५४६ ‘आयटीआय’मधील लाखो विद्यार्थ्यांसमोर आहे. कोल्हापुरात काल, सोमवारी त्याविरोधात विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून या पद्धतीस विरोध केला आहे.
केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत असलेल्या रोजगार व प्रशिक्षण संचालनालयाने ‘आयटीआय’साठी गेल्यावर्षी सत्रपद्धतीने (सेमिस्टर) परीक्षा सुरू केली. त्याला विद्यार्थ्यांचा विरोध असतानाच त्या भरीस भर म्हणून गेल्या परीक्षेपासून नकारात्मक गुणपद्धती लागू केली. केंद्र सरकारच्या आयटीआय शिक्षणाबाबत धोरण तत्कालीन सरकारने महाराष्ट्रातही लागू केले. नकारात्मक गुणपद्धतीत चार प्रश्नांची उत्तरे चुकल्यानंतर एक गुण रद्द होतो. गुणवत्ता वाढावी या उद्देशान परीक्षेचे स्वरूप बदलले. मात्र,आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण-प्रशिक्षण अधिकतर प्रात्यक्षिकांद्वारे दिले जाते. त्यामुळे याठिकाणी नकारात्मक गुणपद्धतीचा उलट परिणाम निकालावर झाला. कोल्हापुरातील ‘आयटीआय’मधून १५ अभ्यासक्रमांसाठी ३७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील अवघे ३७ जण उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारी ही पद्धती शिक्षकांनादेखील नको आहे. विद्यार्थी संघटनांकडून त्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. त्याची दखल घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यातील ‘आयटीआय’कडून नकारात्मक गुणपद्धतीची माहिती, कारणे मागविली आहेत. पहिल्यांदा नकारात्मक पद्धती रद्द करा व मातृभाषेतूनच परीक्षा घ्या, अशी माहिती आयटीआयच्या प्राचार्यांनी पाठविली आहे. केवळ १५ रुपयांत प्रशिक्षित करणारा राज्य शासनाचा आयटीआयचा उपक्रम आहे. त्यातून हजारो विद्यार्थी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहतात. पण, या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसह संस्थेसमोरही अस्तित्वाचीच प्रश्र्न उभा राहिला आहे.
परीक्षा हिंदी, इंग्रजीत का ?
दक्षिण भारतात तेलगू, कन्नड, मल्याळी आदी भाषा प्रदेशांनुसार आयटीआयमध्ये शिक्षण दिले जाते. शिवाय परीक्षादेखील घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रात विविध अभ्यासक्रम मराठीमध्येच शिकविले जातात. मात्र, परीक्षा हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये घेतली जाते. महाराष्ट्राबाबतच अशी वागणूक का, असा सवाल विद्यार्थ्यांतून उपस्थित होत आहे.
नकारात्मक गुणपद्धती त्रासदायक असल्याने ती बंद करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या पद्धतीमुळे निकाल कमी लागल्याचे वास्तव आहे. हे वास्तव आणि विद्यार्थ्यांची मागणी संचालनालयाला कळविली आहे. विद्यार्थी हित हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
- दिनेश माने (प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर)
स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या जिद्द असणारे, सर्वसामन्य कुटुंबातील मुले-मुली याठिकाणी प्रवेशित होतात. पण, सेमिस्टर,नकारात्मक गुणपद्धतीने त्यांच्या शिक्षणाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे सर्व बंद करून पूर्वीप्रमाणे परीक्षा घ्यावी. त्यासाठी फेडरेशनच्या माध्यामातून आम्ही राज्यभर मोर्चाद्वारे लढा उभारला आहे. सांगलीत २० डिसेंबरला याप्रश्नी परिषद होईल. त्यात लढ्याची पुढील दिशा ठरविण्यात येईल.
- दत्ता चव्हाण (राज्य सरचिटणीस, स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडिया)