वृक्ष जगविण्याचे काम करा
By Admin | Updated: July 2, 2016 00:58 IST2016-07-02T00:50:08+5:302016-07-02T00:58:03+5:30
चंद्रकांतदादा पाटील : शिवाजी विद्यापीठात सहा हजार वृक्षांचे रोपण

वृक्ष जगविण्याचे काम करा
कोल्हापूर : वृक्षारोपण जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते जगविणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण लावलेले वृक्ष जगविण्याचे काम करा. निसर्ग संवर्धनासाठी अधिक वृक्ष लावा आणि ते जगवा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील वृक्ष लागवड आणि कृषी सप्ताहाचा प्रारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरातील कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, पालक सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, वनविभागाचे मुख्य संरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, कृषि अधीक्षक बसवराज मास्तोळी प्रमुख उपस्थित होते. वनविभाग, शिवाजी विद्यापीठ, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यात ५० कोटी वृक्ष लावण्याची गरज आहे. त्याअंतर्गत यंदा २ कोटी वृक्ष लावण्याचे सरकारचे ध्येय असले तरी, प्रत्यक्षात ४ कोटी वृक्षांची लागवड होईल. वृक्षारोपणाचा हा उपक्रम लोकचळवळ व्हावी.
खासदार महाडिक म्हणाले, दुष्काळ व वातावरणातील बदलांमुळे वृक्षांचे महत्त्व आपल्या समजले आहे. त्यामुळे वृक्षारोपणाच्या चळवळीत प्रत्येकाने जबाबदारीने योगदान देऊन वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून जिल्ह्णात वीस हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, या चळवळीअंतर्गत विद्यापीठ एकूण १५ हजार झाडे लावणार आहे. प्रत्येक कुटुंबाने किमान तीन वृक्षांचे रोपण करून जगविण्याचे काम करावे.
जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, या वृक्षलागवड चळवळीअंतर्गत जिल्ह्णात ८ लाख वृक्षांची लागवड करून १३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. लागवड केलेल्या वृक्षांची ‘नरेगा’अंतर्गत संवर्धन तसेच रोपलावणीतून ऊस उत्पादन कार्यक्रम केला जाईल. वनसंरक्षक एम. के. राव म्हणाले, वनविभागाचा हा महोत्सव लोकचळवळ बनविली जाईल. वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने त्यांचे रोपण, संवर्धनासाठी योगदान द्यावे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री पाटील व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप, अधिक पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक टी. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तुम्हाला एकच का?
कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसादिनी सुरू केलेल्या कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाची माहिती दिली. याअंतर्गत रस्ता दुभाजकांमधील झाडांची निगा राखण्यासाठी ३० माळी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अशा स्वरूपातील काम प्रत्येकाने केले पाहिजे. खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखे जे आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत, त्यांनी आवाहन केले की, लोक त्यांना मोठ्या प्रमाणावर देणगी देतात, त्यांनी असा निर्णय घेतला पाहिजे की, मी शंभर माळ्यांची नियुक्ती करीन. माझी आर्थिक स्थिती बेताची असल्याने मी एक माळी नियुकत करीन, असा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे पाहत त्यांनी हसत-हसत उल्लेख केला. त्यावर खासदार महाडिक यांनी ‘तुम्हाला एकच का?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावर ‘गिरणी कामगाराचा मुलगा मी,’ असे मंत्री पाटील यांनी उत्तर दिले. त्याला खासदार महाडिक यांनी ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असे प्रत्युत्तर देताच उपस्थितांमध्ये एकच हास्य पसरले.