तुमच्या पगारासाठीच आम्ही कर भरायचा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:13+5:302021-09-18T04:27:13+5:30
कोल्हापूर : शहरातील रस्ते खराब झाले आहेत, कचऱ्याचे ढीग पडले आहेत. नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागत असताना प्रशासनातील ...

तुमच्या पगारासाठीच आम्ही कर भरायचा का?
कोल्हापूर : शहरातील रस्ते खराब झाले आहेत, कचऱ्याचे ढीग पडले आहेत. नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागत असताना प्रशासनातील अधिकारी काहीच कार्यवाही करताना दिसत नाहीत. आम्ही फक्त तुमच्या पगारासाठीच कर भरायचे का? असा उद्वीग्न सवाल शुुक्रवारी महानगरपालिका प्रशासनास माजी पदाधिकाऱ्यांनी विचारला.
माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, शारंगधर देशमुख, सचिन पाटील, आदिल फरास, सिचन चव्हाण, सुनील पाटील, राहुल चव्हाण, रिना कांबळे, शोभा कवाळे आदी माजी पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी पालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली.
गणेश विसर्जनाच्या तयारीवरून चर्चेला सुरवात झाली. मंडळांना मूर्तिदान करण्याचे आवाहन केलेले नाही. याबाबत मंडळांना अद्याप विश्वासात घेतलेले नाही. इराणी खणीकडे जाणारे सर्व बाजूचे रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यांवर पॅचवर्क केलेले नाहीत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर बलकवडे यांनी विसर्जनाचे नियोजन पूर्ण झाले असून रस्ते तातडीने पॅचवर्क केले जातील असे सांगितले.
शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून ठिकठिकाणचे कंटेनर उचलल्यामुळे कचरा साचून रहात आहे. राेज कचरा उठाव करावा, आर. सी. गाड्या तातडीने दुरुस्त करुन घ्याव्यात. शहरात वेगवेगळ्या भागात बायोमायनिंग प्रकल्प सुरु करावेत, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
खासगीकरणातून सुरु केलेला पथपद दिव्यांचा प्रकल्प राबविणाऱ्या ठेकादाराकडून बंद पडलेले दिवे तातडीने बदलले जात नाही . अधिकाऱ्यांना विचारले तर ठेकेदार दाद लागून देत नाहीत असे सांगतात. जर ठेकेदाराने २४ तासाच बंद पडलेले बल्ब बदलले नाहीत तर त्यास दंड करण्याच्या अटीवर प्रकल्पाला मान्यता दिली आहे. ठेकेदार ऐकणार नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, असा आग्रह माजी पदाधिकाऱ्यांनी धरला.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे, पूरग्रस्तांना घरफाळा, पाणी बिलात सवलत देणे याविषयावरही यावेळी चर्चा झाली.
फोटो क्रमांक - १७०९२०२१-कोल-केएमसी
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेत शुक्रवारी माजी पदाधिकारी आणि अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाली.