राजकीय द्वेषातून प्रकल्पग्रस्त वेठीस नकोत : शहाजी वारके
By Admin | Updated: July 18, 2014 23:26 IST2014-07-18T23:16:51+5:302014-07-18T23:26:11+5:30
निवडणूक डोळ््यासमोर ठेवून वक्तव्य

राजकीय द्वेषातून प्रकल्पग्रस्त वेठीस नकोत : शहाजी वारके
गारगोटी : माजी आम. संजय घाटगे हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चिकोत्रा आणि नागनवाडी प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात राजकीय हेतूने आरोप करीत असून, सरकारने या आरोपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी करावी. राजकीय द्वेषातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, हे प्रकल्पग्रस्त कधीही सहन करणार नाहीत, असा इशारा दिंडेवाडी (ता. भुदरगड)चे सरपंच डॉ. शहाजी वारके यांनी दिला. ते दिंडेवाडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
वारके म्हणाले, सामूहिक प्रयत्नातून या प्रकल्पांचे काम सुरू आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. दिंडेवाडी-बारवे प्रकल्पाचे काम २००० पासून सुरू आहे. प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र ३४२ हेक्टर आहे. १३७ शेतकऱ्यांनी स्वेच्छेने पुनर्वसन स्वीकारले आहे. उर्वरित २०५ शेतकऱ्यांचे १२२ हेक्टर क्षेत्र पुनर्वसनासाठी लागणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक गावांतील पिण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून, ७५०
हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विश्वनाथ कुंभार म्हणाले, पुनर्वसन अथवा धरण निर्मितीच्या कोणत्याही कामात सहभाग नसताना संजय घाटगे राजकीयदृष्ट्या खोटी मिजास मारण्यासाठी प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त शेतकऱ्यांसह सरकारची बदनामी करीत आहेत. संजय घाटगेंनी स्वत:ची जमीन प्रकल्पग्रस्तांना स्वखुशीने देऊन प्रकल्पास सहकार्य करावे. बैठकीस धनाजी पाटील, बारवेचे सरपंच देसाई गुरुजी, सिराज देसाई, हिंदुराव चव्हाण यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित
होते.