टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना चोप

By Admin | Updated: November 21, 2014 00:35 IST2014-11-21T00:01:37+5:302014-11-21T00:35:49+5:30

कळंबा टोलनाका : महिलांचा रूद्रावतार, प्लास्टिकचे बॅरिकेट्स फेकले; काही काळ टोलवसुली बंद

Do not touch the towels | टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना चोप

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना चोप

कोल्हापूर : टोल देण्यास नकार देऊन पर्यायी मार्गाने जाणाऱ्या ट्रकचालकास मारहाण केल्याचे पडसाद आज, गुरुवारी कळंबा टोलनाक्यावर सकाळी उमटले. टोलविरोधी कृती समितीतील महिलांनी रुद्रावतार धारण करून नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून प्लास्टिकचे बॅरिकेट्स फेकून देऊन संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे कर्मचारी तेथून पसार झाले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग होऊन टोलवसुली बंद झाली.
शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने नितीन राजाराम चव्हाण (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) या ट्रकचालकाला मारहाण करणाऱ्या संशयितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद ढोमे यांच्याजवळ केली. त्यानंतर चव्हाण याच्यासह सर्वजण पोलीस ठाण्यात पुन्हा फिर्याद देण्यासाठी गेले. त्यानंतर वातावरण निवळले. दरम्यान, काल, बुधवारी दुपारी ट्रकचालक चव्हाण याला टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. याची एक तोळ्याची सोन्याची चेन चोरीस गेली. याप्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल केली.
याच्या निषेधार्ह आज, गुरुवारी सकाळी टोल समितीचे कार्यकर्ते नाक्याच्या शंभर मीटरच्या बाहेर हळूहळू जमा होऊ लागल्यामुळे नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोलवसुली बंद केली. समितीच्या कार्यकर्त्या दीपा पाटील, चारूलता चव्हाण, आदींनी पोलिसांसमोर नाक्यावर थांबलेल्या एका कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण केली. हा प्रकार पाहून इतर कर्मचाऱ्यांनी धूम ठोकली. नाक्याजवळ प्लास्टिकचे बॅरिकेट्स शेजारील रस्त्यावर फेकून दिले.
त्यानंतर टोल समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी, ट्रकचालक चव्हाण याला मारहाण करणाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करा, समितीतील कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने आंदोलनावेळी दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे कळंबा टोलनाक्यावरील ज्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली, त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली. यावेळी ट्रकचालक नितीन चव्हाण हाही उपस्थित होता.
आंदोलनात बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, संभाजीराव जगदाळे, नगरसेवक मधुकर रामाणे, चंद्रकांत यादव, लालासाहेब गायकवाड, अशोक पोवार, चंद्रकांत बराले, अजित सासने, सुनील मोरे, रमेश मोरे, बाबा देसाई, श्रीकांत भोसले, राजू जाधव, जयकुमार शिंदे, वैशाली महाडिक, प्रकाश कदम यांच्यासह कळंबा ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व नागरिकांचा सहभाग होता.

कोल्हापुरात गुरुवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्यावतीने कळंबा टोलनाक्यावर आंदोलन केले. यावेळी ट्रकचालक नितीन चव्हाण यांनी उपस्थित राहून प्रसारमाध्यमांसमोर वादावादीचा घडलेला प्रकार कथन केला. यावेळी बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, चारुलता चव्हाण, राजू जाधव, लालासाहेब गायकवाड, दीपा पाटील, वैशाली महाडिक, आदी उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात समितीच्या कार्यकर्त्यां दीपा पाटील यांनी टोलनाक्यावरील प्लास्टिकचे बॅरिकेटस् फेकून दिले.

फलक लक्ष्यवेधी... अन् प्रचंड घोषणाबाजी

‘पोलीस संरक्षणात सुरू असलेला खंडणी नाका,’ ‘पोलीस खात्यात एकतरी सिंघम आहे का?’ अशा आशयाचे फलक यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘आय.आर.बी.चा बोका, दिसेल तेथे ठोका’, ‘देणार नाही, देणार नाही, टोल आम्ही देणार नाही,’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


नाक्याला पोलिसांचा वेढा...
कळंबा टोलनाक्याला पोलिसांनी वेढा घातला होता. त्यामुळे साईमंदिर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनकर मोहिते, दयानंद ढोमे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त होता.


गुंडगिरी, दहशत माजविणाऱ्यांवर कारवाई करा...

आय.आर.बी.च्या सर्व नाक्यांवर गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. गुंडगिरी, दहशत व मारहाण करणाऱ्या गुंडांवर कारवाई व्हावी. तसेच कायदा व सुव्यवस्था तसेच रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने पोलीस निरीक्षक ढोमे यांना दिले.

टोलसमितीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण, गुरुवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल नव्हता. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद ढोमे यांनीही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले.

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यात मला पोलिसांकडून दुजाभावाची वागणूक मिळाली.
- नितीन चव्हाण, ट्रकचालक

Web Title: Do not touch the towels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.