सत्कारात वेळ घालवू नका
By Admin | Updated: July 1, 2015 00:39 IST2015-07-01T00:39:23+5:302015-07-01T00:39:23+5:30
पाटील यांच्या डकरेंना सूचना : निवडीनंतर ‘स्मार्ट सिटी’साठी बैठकीचे आयोजन

सत्कारात वेळ घालवू नका
कोल्हापूर : शहराच्या नूतन महापौरांना महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दीड ते दोन महिन्यांचा कालावधी काम करण्यासाठी मिळणार आहे. या अल्पकाळात अनेक कामे मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे हार-तुरे स्वीकारत सत्कार-समारंभात वेळ न घालविता खोळंबलेली कामे मार्गी लावा, असे आवाहन शहराच्या होणाऱ्या नूतन महापौर वैशाली डकरे यांना केले असल्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत पदांची खांडोळी केली जाणार नाही. यापूर्वी महापालिकेचे नेतृत्व करणाऱ्यांनी कोल्हापूरमध्ये अवघ्या दीड-दीड महिन्याने महापौर करून संपूर्ण देशात हसे करून घेतले, ही चूक आम्ही करणार नाही, असे निवडणुकीच्या प्रचारात सांगत कॉँग्रेस व राष्ट्रवादीने महापालिकेची सत्ता हस्तगत केली. मात्र, पक्षीय राजकारण व सत्तेच्या लाभाचे पद देऊन कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी महापौर पदासह सर्वच पदांची कॉँग्रेस व राष्ट्रवादीने खांडोळी के ली.
अंतर्गत कुरघोडींमुळे सभागृहाच्या शेवटच्या टप्प्यात दहा ते अकरा महिन्यांसाठी कॉँग्रेसच्या पर्यायाने सतेज पाटील यांच्या गटाच्या वाट्याला येणारे महापौरपद अवघ्या पाच महिन्यांवर आले. या पाच महिन्यांतील दीड ते दोन महिनेच महापौरांना पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळणार आहे. या अल्पकाळात हार-तुरे व सत्कार-समारंभ करण्यात नूतन महापौरांनी वेळ दवडू नये. दि. ४ व ५ जुलै या दोन दिवशीच खास सत्कार स्वीकारून नंतर बंद करावा, अशी सूचना सतेज पाटील यांनी डकरे यांना केली आहे. (प्रतिनिधी)
सर्वसाधारण सभेत पदावर शिक्कामोर्तब
वैशाली डकरे यांच्या महापौर निवडीवर शनिवारी (दि. ४) विशेष सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. सकाळी ११ वाजता निवड जाहीर होणार आहे. यानंतर त्याच दिवशी दुपारी चार वाजता नूतन महापौरांनी शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश व्हावा, या पाठपुराव्यासाठी तयारीच्या अनुषंगाने महापालिकेत बैठकीचे आयोजन केले आहे.