गृहरक्षकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
By Admin | Updated: December 15, 2014 00:12 IST2014-12-15T00:11:58+5:302014-12-15T00:12:17+5:30
उपासमारीची वेळ : परेडसह वर्धापनदिन कार्यक्रमावर संक्रांत; जिल्हा समादेशक पद रिक्त

गृहरक्षकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
एकनाथ पाटील -कोल्हापूर -ड्यूटी नाही की मानधनाचा पत्ता नाही, घरी बसून ड्यूटीची आणि थकीत मानधनाची प्रतीक्षा करण्यातच त्यांचे दिवसामागून दिवस निघून जात आहेत; परंतु मानधनापासून ते वंचित राहिल्याने जिल्ह्यातील सुमारे १२०० गृहरक्षकांच्या (होमगार्ड) कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
उत्सव, मोर्चा, दंगली, निवडणुका आणि सभेच्या ठिकाणची गर्दी, आपत्ती यावेळी पोलिसांना मदत व्हावी, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृहविभागाने ६ डिसेंबर १९४६ रोजी संपूर्ण देशात गृहरक्षक दलाची स्वतंत्र स्थापना केली. त्यानुसार कोल्हापुरातही नागाळा पार्कमध्ये कसबा बावड्याकडे जाताना गृहरक्षक दलाचे कार्यालय स्थापन केले. याठिकाणी जिल्हा समादेशकासह आठ प्रशासकीय कर्मचारी व १२०० गृहरक्षक असे कर्मचारी काम करीत आहेत. प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी वेतनावर, तर गृहरक्षकांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली. स्थापनेपासून गृहरक्षक दलाला पोलिसांचा धाकला भाऊ म्हणून ओळखले जात आहे.
दरम्यान, येथील गृहरक्षक दलाकडे दरवर्षी सरासरी चार कोटी प्राप्त होणारा निधी यावर्षी मंजूर झालाच नाही. त्याचबरोबर त्याचा पाठपुरावा करणारे जिल्हा समादेशक विलास पाटील-कौलवकर हे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांचे पद रिक्त राहिल्याने निधीचा पाठपुरावा करणार कोण? गेली ६८ वर्षे नियमित सुरू असलेल्या गृहरक्षक दलास निधीअभावी अखेरची घरघर लागल्याने वर्षभरात घेतले जाणारे आरोग्य शिबिर, प्रशिक्षण, परेडचे कार्यक्रम रद्द करण्यात आले.
पैसा नसल्याने त्यांच्या कुटुंबाचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मानधन जमा झाले की नाही, याची विचारणा करण्यासाठी अनेकजण कोल्हापूर येथील भवानी मंडपामध्ये असणाऱ्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.
गृहरक्षक दलातील जिल्हा समादेशक पद हे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. या जागेवर नियुक्त होण्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखती झाल्या आहेत. तेथून त्यांचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु त्यावर अद्यापही निर्णय न झाल्याने हे पद रिक्त आहे. त्यामुळे या कार्यालयाची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अरुण पवार हे याठिकाणी सुपरवायझरची भूमिका बजावीत आहेत.
वर्धापनदिन साधेपणाने
दरवर्षी गृहरक्षक दलाचा वर्षापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंत्री, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो.त्याचबरोबर वर्धापनदिनही कार्यालयातच साधेपणाने साजरा केला, तर परेडही यावर्षी बंद केली.
गृहरक्षक दलास निधी मंजूर न झाल्याने कर्मचाऱ्यांचे मानधन देता आलेले नाही. त्याचबरोबर यावर्षीची परेड रद्द करून वर्धापनदिनही साधेपणात करण्यात आला.
-विठ्ठल दळवी,
प्रशिक्षण सुभेदार