पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची नावे वगळू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:01+5:302021-06-16T04:33:01+5:30
गडहिंग्लज : पंतप्रधान आवास योजनेतील ३७ लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम तांत्रिक अडचणीमुळेच थांबले आहे. परंतु, छोट्या भू-खंडांना बिगरशेती परवान्याची आवश्यकता ...

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची नावे वगळू नका
गडहिंग्लज : पंतप्रधान आवास योजनेतील ३७ लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम तांत्रिक अडचणीमुळेच थांबले आहे. परंतु, छोट्या भू-खंडांना बिगरशेती परवान्याची आवश्यकता नसल्याचे शासकीय परिपत्रक आहे. त्यानुसार त्यांना बांधकाम परवाने द्या, त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळू नका, अशी सूचना नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी केली.
गडहिंग्लज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत अनुदान मंजूर असूनही बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांची नावे वगळ्याची शिफारस प्रशासनाने सभागृहाला केली होती. त्यासंदर्भात त्यांनी ही सूचना केली. पालिकेने १२ लाभार्थ्यांना भीमनगर चौक ते दड्डी आॅइल मील रस्त्यालगत घरांसाठी जागा दिली आहे. परंतु, २०१५ च्या शहर विकास आराखड्यात त्याठिकाणी ९ मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याचे आरक्षण आहे. त्यामुळे संबंधितांना घरबांधणी परवाना देण्यात अडचणी आहेत. त्यामुळे त्या रस्त्याचे आरक्षण रद्द करून तो भाग रहिवासी विभागात समाविष्ट करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या निधीतून पाथ-वे न करता त्याचा स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा आणि प्राप्त ७५ लाखांतून नदीघाटाचाच अधिकाधिक विस्तार करावा, अशी सूचना नरेंद्र भद्रापूर यांनी केली. त्यानुसार दुरूस्ती करून प्रस्ताव तांत्रिक मान्यतेला पाठविण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले. विकासकामांत प्रभाग ३ मधील कामांचाही समावेश करण्याची सूचना सावित्री पाटील यांनी तर भीमनगरमधील काँक्रीट रस्ता ५ टक्के निधीतून करण्याची सूचना रेश्मा कांबळे यांनी केली.
स्वच्छ भारत अभियानातील बक्षिसाची रक्कम नदीघाट सुशोभीकरणासह सांडपाणी बंधा-याच्या विस्तारीकरणासाठी वापरण्याची सूचना हारून सय्यद यांनी केली. परंतु, बक्षिसाची रक्कम स्वच्छतेसाठीच वापरण्याचे शासकीय निर्देश असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी पालिका कोविड काळजी केंद्रातील कामाचा आढावा घेतला. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी प्रशासनाची बाजू मांडली.
महत्त्वाचे मुद्दे
-
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना ५ कोटींच्या ठोक निधीसाठी प्रस्ताव देण्याचा निर्णय झाला.
- आमदार निधीतील १ कोटी ३९ लाखांच्या विकासकामांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
- १ कोटी ४० लाखांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
--------------------
* गडहिंग्लज पालिका : १५०६२०२१-गड-१०