बघ्याची नको, लढ्याची तयारी ठेवा
By Admin | Updated: August 18, 2015 23:44 IST2015-08-18T23:44:07+5:302015-08-18T23:44:07+5:30
एन. डी. पाटील : वाढीव दराने वीज बिले भरणार नाही; इरिगेशन फेडरेशनच्या मेळाव्यात शेतकऱ्यांचा निर्धार

बघ्याची नको, लढ्याची तयारी ठेवा
कोल्हापूर : ‘महावितरण’ने केलेली दरवाढ एकतर्फी, अन्यायी आहे. त्याला वेळीच रोखणे आवश्यक आहे. अन्यथा महावितरण आपल्याला लुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वीज दरवाढीच्या प्रश्नाविरोधात संघटित व्हा. लढ्याची तयारी ठेवा. लढ्याबाबतची तुमची तयारी दिसली की, त्यात तुमच्यापुढे एक पाऊल मी असेन. बघ्याची भूमिका घेऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे शेतकऱ्यांना केले. वाढीव दराने आलेली कृषिपंपांची वीज बिले न भरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे आयोजित सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात केला.
वीज दरवाढीविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात मेळावा झाला त्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, संपतराव पवार-पाटील, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, उपस्थित होते.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. पाटील म्हणाले, ‘महावितरण’ने केलेली ४४ पैशांची दरवाढ आयोगाकडे न जाता आणि आम्हाला नोटीस न देता एकतर्फी केली आहे. त्याला कोणताही आधार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. ‘महावितरण’चा आजपर्यंतचा अनुभव पाहता सहजपणे दरवाढ मागे घेतली जाईल असे वाटत नाही. संप हे आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठीचे हत्यार आपल्याजवळ नाही. त्यामुळे महावितरण आणि पर्यायाने सरकारशी दोन हात करण्यासाठी तयार राहा. माझा श्वास असेपर्यंत तुमच्या प्रश्नांसाठी लढा देत राहीन. पण, दरवाढी तसेच अन्य प्रश्न केवळ एकट्या-दुकट्याचे नाहीत. ते समस्त शेतकऱ्यांचे आहेत. ज्यांच्याशी संघर्ष करावयाचा आहे त्यांना शेतकऱ्यांबद्दल काही देणे-घेणे नाही. त्यामुळे आपल्या लढ्याबाबत बघ्याची भूमिका घेऊ नका, संघटित आणि सक्रियपणे यात सहभागी व्हा.
मेळाव्यात दरवाढ मागे घेईपर्यंत सध्या वाढीव दराने आलेली वीजबिले न भरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी
केला. यावेळी बाबासाो पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, जे. पी.
लाड, सखाराम पाटील, आर. के. पाटील, सुभाष शहापुरे, मारुतराव जाधव, रणजित जाधव, मारुती पाटील आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी, सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गटनिहाय समित्या स्थापन करा
वीज, ठिंबक सिंचन आदींचे अनुदान बंद करून शासनाने शेतकऱ्यांवर
अन्याय केला आहे. सध्याची वीज दरवाढ अन्यायी असल्याने त्याविरोधात
लढा देण्याची गरज आहे शिवाय गावांमध्ये गटनिहाय समित्यांची स्थापना
करून ‘महावितरण’च्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यात यावे, असे आवाहन अरुण लाड यांनी केले.
ऊर्जामंत्र्यांच्या कार्यवाहीवर पुढील दिशा
शासन व ‘महावितरण’ने विद्युत नियामक आयोगाच्या जाहीर सुनावणीवेळी कृषिपंपांना दरवाढ मान्य केली नसताना तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत कृषिपंपांना दरवाढ करणार नसल्याचे जाहीर केले असताना ‘महावितरण’ने एकतर्फी दरवाढ केल्याचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, १ जून २०१५ पासून ७२ पैसे प्रतियुनिट असलेला वीजदर १ रुपये १६ पैसे करून ४४ पैशांची दरवाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. ‘महावितरण’ने केलेली दरवाढ मागे घ्यावी, याबाबत ऊर्जामंत्र्यांना गेल्या आठवड्यात निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून जी कार्यवाही होईल, त्यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.