नुसते पाहणीचे फोटोसेशन नको, रस्त्याचा दर्जा तपासा!
By Admin | Updated: November 25, 2014 23:53 IST2014-11-25T23:33:58+5:302014-11-25T23:53:23+5:30
नागरिकांच्या प्रतिक्रिया : अधिकाऱ्यांनी केली पुन्हा रिंग रोडची पाहणी

नुसते पाहणीचे फोटोसेशन नको, रस्त्याचा दर्जा तपासा!
कोल्हापूर : नगरोत्थान योजनेतून मंजूर होऊनही गेली चार वर्षे रखडलेल्या फुलेवाडी रिंग रोडवरील रस्त्याच्या कामास आता सुरुवात होत आहे. तसेच शहरातील १५० हून अधिक लहान-मोठ्या रस्त्यांना डांबर लावण्याचे काम सुरू आहे. या कामांची पाहणी करून त्याचे छायाचित्र माध्यमांतून छापून आणण्याची प्रशासन व पदाधिकाऱ्यांना घाई झाली आहे. पाहणीचा फार्स करू नका, त्यापेक्षा दर्जा तपासा. यापूर्वीच लक्ष दिले असते तर कोल्हापूर खड्ड्यात गेले नसते, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहे.
नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेला फुलेवाडी-रिंगरोड रस्ता कधी पाईपलाईनचे कारण सांगून, तर कधी जमीन अधिग्रहणाच्या कारणांमुळे रखडला. या रस्त्यासह सध्या शहरातील ३८ किलोमीटरची १०८ कोटी खर्चाची नगरोत्थान योजनेतील कामे सुरू होत आहेत. याव्यतिरिक्त महापालिकेने शहरातील लहान-मोठ्या १५० हून अधिक रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. १२५ कोटी रुपये खर्चून तयार होणारे हे रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कामे सुरू न केलेल्या ठेकेदारांवर कारवाई केलेली नाही. दरवेळीप्रमाणे जनतेचा पैसा पुन्हा खड्ड्यात घालू नका, अशी मागणी नागरिकांतून होत असल्याने प्रशासन रस्त्याबाबत जागरूक बनले आहे.
जबाबदारीही स्वीकारा
‘पीडब्ल्यूडी’च्या निकषांनुसार कारपेट, बीबीएम किंवा हॉटमिक्स अशा कोणत्याही प्रकारे केलेला रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे. मात्र, शहरातील कोणताही रस्ता कसाबसा एक पावसाळा टिकतो. रस्ता कोणी केला? खराब कधी झाला? त्याची जबाबदारी कोणाची? याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.