पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप नका
By Admin | Updated: December 5, 2014 00:22 IST2014-12-04T23:54:27+5:302014-12-05T00:22:07+5:30
मनोजकुमार शर्मा : पदाधिकारी, कार्यकर्त्यांना इशार

पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप नका
कोल्हापूर : पोलीस ठाण्याच्या दैनंदिन शासकीय कामकाजामध्ये राजकीय पक्ष, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा हस्तक्षेप वाढत आहे. याची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी, अशा प्रकारे जर कोणी हस्तक्षेप केल्याचे आढळून आल्यास, होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागण्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.
शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. गत आठवड्यात रंकाळा टॉवर परिसरात झालेल्या घर पेटविण्याच्या प्रकारावेळी एक माजी नगरसेवक पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी त्याने संशयितांची बाजू घेतली असल्याचे समजते. दरम्यान, जिल्ह्यातील पोलीस ठाणे विशेषत: राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा या शहरातील चार तसेच करवीर पोलीस ठाण्यात दैनंदिन स्तरावरील शासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेपाचे प्रमाण वाढले असल्याचे व त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय कामकाज करण्यामध्ये अडचणी / बाधा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब जनहिताच्या दृष्टिकोनातून गंभीर स्वरूपाची आहे. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.