विकासात ‘अडसर’ नको, ‘शिल्पकार व्हा!
By Admin | Updated: June 30, 2016 23:54 IST2016-06-30T23:54:11+5:302016-06-30T23:54:52+5:30
‘गडहिंग्लज’चे महालक्ष्मी मंदिर : १७ माजी नगराध्यक्षांचे आवाहन’

विकासात ‘अडसर’ नको, ‘शिल्पकार व्हा!
गडहिंग्लज : तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत शासनाकडून निधी मिळालेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणामुळे गडहिंग्लजच्या वैभवात भर पडणार असून, धर्मशाळा व प्राथमिक शाळा इमारतीमुळे गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची हेळसांड थांबणार आहे. त्यामुळे ‘विकासात अडसर ठरू नका, विकासाचे शिल्पकार व्हा’, असे आवाहन विद्यमान नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्यासह १७ माजी नगराध्यक्षांनी निवेदनाद्वारे संबंधितांना केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषद व नागरिकांच्या सहकार्याने आणि शैक्षणिक, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील कामामुळे गडहिंंग्लज शहर हे उपजिल्ह्याचे ठिकाण असून, नावारूपास येत असल्यामुळे येथील नागरिकांची जबाबदारी वाढली आहे.
तीर्थक्षेत्र विकास योजनेतून नगरपालिकेला चार कोटी २६ लाखांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये महालक्ष्मी मंदिर परिसर विकासकामांचा समावेश आहे. त्यामध्ये मूळ गाभाऱ्याला हात न लावता परिसर सुशोभीकरण, मंडप मजबूत व आकर्षक करणे, धर्मशाळा व प्राथमिक शाळा व स्टेज बांधकाम आदी कामे प्रस्तावित आहेत.
मंदिराच्या बाजूच्या रिकाम्या जागेत गेली अनेक वर्षे धर्मशाळा होती. त्यानंतर त्या ठिकाणी भरणाऱ्या प्राथमिक शाळेत अनेक मान्यवरांनी शिक्षण घेतले असून, त्या ठिकाणी गोरगरिबांची मुले शिकतात. २००४-०५ मध्ये शाळा इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका नको म्हणून इमारत उतरविण्यात आली. त्यामुळे ही शाळा सुपर मार्केट व महादेव मंदिराच्या जीर्ण खोल्यांत भरत असून, मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे.
धर्मशाळा असतानाही अनेकवेळा महालक्ष्मी यात्रा यशस्वीरीत्या पार पडली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शाळा व धर्मशाळा झाल्यामुळे कोणतीही अडचण होत नाही. धर्मशाळेचा हॉल नागरिकांच्या घरगुती व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्ट, यात्रा समितीसह आबालवृद्धांनी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
निवेदनावर उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, प्रा. विठ्ठल बन्ने, शिवाजी खणगावे, दत्तात्रय बरगे, राजन पेडणेकर, वसंत यमगेकर, अकबर मुल्ला, महादेवी नेवडे, बापू
म्हेत्री, निरुपमा बन्ने, स्वाती कोरी, बसवराज खणगावे, राजेंद्र मांडेकर, अरुणा शिंदे, मंजूषा कदम, लक्ष्मी घुगरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
शांतता भंग नको; निधी परत जाऊ नये
कोणत्याही प्रकारे असंतोष निर्माण होऊन शहराची शांतता भंग होऊ नये आणि शासकीय निधी परत जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी संबंधित सर्वांची संयुक्त बैठक घेऊन प्रस्तावित काम सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंतीदेखील माजी नगराध्यक्ष यांनी केली आहे.