विसर न व्हावा... त्यांचा विसर न व्हावा...
By Admin | Updated: January 19, 2017 00:47 IST2017-01-19T00:47:33+5:302017-01-19T00:47:33+5:30
शिवाजी चौक सुशोभीकरण : विल्सनचा पुतळा फोडणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची नावे कोरण्याच्या आश्वासनाची पूर्ती करावी

विसर न व्हावा... त्यांचा विसर न व्हावा...
कोल्हापुरातील शिवाजी चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हे करत असताना विल्सनचा पुतळा फोडणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची नावे तेथे असावीत. ती विस्मृतीत जाऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करणारे करवीर तालुक्यातील सांगवडेवाडीच्या जयंत व्यंकटेश देशपांडे यांनी ‘लोकमत’ला पाठविलेले हे पत्र...!
‘लोकमत’च्या हॅलो कोल्हापूरमध्ये गेल्या २४ डिसेंबर रोजी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. ‘ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार - छत्रपती शिवाजी चौकाचे सुशोभीकरण’ अशी ती बातमी होती. या चौकामध्ये अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. पण एक पथदर्शी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ऐतिहासिक प्रसंग विस्मरणात जातो आहे. त्यासाठी हा पत्रप्रपंच मी करतो आहे. त्याचा आपण सर्वांनी विचार करावा, ही नम्र विनंती आहे. ॅकोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसीना फरास, उपमहापौर अर्जुन माने, आदींना ही खास विनंती आहे.
या सर्वांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सध्याच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागी पूर्वी मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड विल्सन यांचा पुतळा होता. १९४३ साली स्वातंत्र्यलढा तीव्र झाला होता. त्यामुळे गव्हर्नर विल्सन यांच्या पुतळ्याला रात्रंदिवस बंदूकधारी पोलिसांचा पहारा होता. थोर स्वातंत्र्यसेनानी कै. शंकरराव माने (कोल्हापूर), व्यंकटेश वा. देशपांडे (सांगवडेवाडी), माजी आमदार काका देसाई, कुंडल देसाई (म्हसवे), शामराव पाटील, नारायण घोरपडे (वडणगे) या सहा तरुणांनी पुतळा साफसफाई करण्याचा बहाणा करून पहाटे पाचच्या सुमारास गव्हर्नर विल्सनचा पुतळा घणाचे घाव घालून फोडला आणि सहा दिशांनी हे सहा तरुण पळून गेले. या सर्वांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पकड वॉरंट जारी केले आणि पकडून देणाऱ्यांसाठी पाचशे रुपयांचे (त्यावेळचे) बक्षीसही जाहीर केले.
स्वातंत्र्यप्रेमाने भारलेल्या या सहा स्वातंत्र्यवीरांनी या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर असे लिहिले होते की, ‘या चबुतऱ्यावर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचाच पुतळा उभा करावा; अन्य कोणाचा दुसरा पुतळा उभा केल्यास तो टिकू देणार नाही.’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या प्रेरणेने भारावलेल्या या स्वातंत्र्यवीरांचा इंग्रजी सत्तेशी लढा चालू होता. त्यांच्या आणि कोल्हापुरातील जनतेच्या मनातील भावना जाणून घेऊन शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याच चबुतऱ्यावर उभा केला, तो सुदिन होता १३ मे १९४५. गव्हर्नर विल्सन यांचा पुतळा या स्वातंत्र्यवीरांनी १३ सप्टेंबर १९४३ रोजी फोडला होता.
या ऐतिहासिक प्रसंगाचा सुवर्णमहोत्सव १९९३ मध्ये झाला. त्यानिमित्त तत्कालीन महापौर भिकशेठ पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर महापालिकेच्यावतीने या स्वातंत्र्यवीरांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी या सहा स्वातंत्र्यवीरांची नावे ‘स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार’ म्हणून त्या चबुतऱ्याखाली कोरण्याचे जाहीरपणे सांगितले होते. पण त्या गोष्टीची अद्याप पूर्तता झालेली नाही.
सध्या या पुतळ्याच्या चौकाचे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यावेळी त्या स्वातंत्र्यवीरांची नावे याच चौकात एक मानस्तंभ उभा करून त्यावर कोरली जावीत, अशी अपेक्षा आहे आणि ही जागा कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला स्फूर्ती देणारी सदैव रहावी, अशी अपेक्षा आहे. यासाठी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ तसेच महापौर, उपमहापौर आणि महापालिकेने तळमळीने प्रयत्न केल्यास हे काम सहज होऊन जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी प्रयत्न केले, त्यासाठी पाया निर्माण केला त्यांची नावे चिरस्मरणीय ठरावीत, नव्या पिढीसाठी उजेडात यावीत एवढीच अपेक्षा आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर राहिलेले आणि स्वातंत्र्यलढ्यात महान कार्य केलेल्या या महनीय व्यक्तींना न्याय देण्याचे काम सुशोभीकरण समितीने करावे, ही नम्र विनंती.