शाहू समाधिस्थळाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:43 AM2018-06-18T00:43:36+5:302018-06-18T00:43:36+5:30

Do not forget about Shahu Samadhi | शाहू समाधिस्थळाचा विसर

शाहू समाधिस्थळाचा विसर

Next

तानाजी पोवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा देणारे समाधिस्थळ भूमिपूजनानंतर पाच वर्षे उलटली तरीही अपूर्णच आहे. सुमारे १० कोटी रुपये खर्चाचा हा समाधिस्थळाचा आराखडा अवघ्या दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना यंदा तरी हे समाधिस्थळ पूर्ण होणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. महापालिकेच्या नेत्यांकडून व नगरसेवकांकडून पावलोपावली शाहूंच्या विचारांचा गजर होताना दिसतो; मात्र समाधिस्थळाच्या कामाकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. सद्य:स्थितीत फक्त चबुतरा पूर्णत्वाच्या दिशेने असून, इतर बाबी अधांतरीच आहेत.
१३ सप्टेंबर १९१६ रोजी राजर्षी शाहू महाराजांनीच त्यांचे समाधिस्थळ हे नर्सरी बागेत असावे, असे आदेशात लिहून ठेवले होते. त्यानुसार राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य पुढील पिढीपर्यंत प्रेरणादायी ठरावे यासाठी ‘सी’ वॉर्डातील नर्सरी बागेत हे समाधिस्थळ उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. २९ नोव्हेंबर २०१३ रोजी तत्कालीन महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुमारे १०७६९ चौरस मीटर जागेत हा प्रकल्प साकारण्यासाठी पावले उचलली. वास्तुविशारद अभिजित जाधव-कसबेकर यांनी आराखडा तयार केला. मधल्या टप्प्यात चार महापौर होऊनही त्यांनी समाधिस्थळ पूर्णत्वात रस दाखविला नाही. गेल्याच वर्षी हे समाधिस्थळ पूर्ण करण्यासाठी तत्कालीन महापौर हसिना फरास यांनी प्रयत्नांची शर्थ केली. पण, त्याच्या कारकिर्दीत चबुतऱ्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले. त्यानंतर मात्र हे काम रखडले ते अद्याप ‘जैसे थे’ स्थितीतच आहे.
राजर्षी शाहूंच्या विचारास शोभेल, पावित्र राहील असे समाधिस्थळ असणाºया चबुतºयावर उभारण्यात येणारी ब्रॉँझची मेघडंबरी शंभर वर्षांपूर्वीची असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही मेघडंबरी ओतीव पद्धतीने तयार करण्याचे काम बापट कॅम्पमधील शिल्पकार किशोर पुरेकर हे करीत आहेत. भूमिपूजनानंतर सुमारे पाच वर्षांचा कालावधी उलटला तरी फक्त चबुतºयाव्यतिरिक्त काम पुढे सरकत नसल्याचे वास्तव आहे.
काम कासवगतीने : तट मारून संरक्षण
नर्सरी बागेच्या विस्तीर्ण जागेत राजर्षी शाहू समाधिस्थळासोबत या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचे मंदिर विकसित करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह विकसित करून तेथे २५० व्यक्ती बसण्याची क्षमता असणारे ऐतिहासिक वाटावे असे डिझाईनचे सभागृह, तेथे राजर्षी शाहू व डॉ. आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणारे संग्रहालय करण्यात येणार आहे; पण अद्याप तरी त्यासाठी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.
शिवाय समाधिस्थळाला संरक्षक भिंत व पादचारी मार्ग, तसेच बगीचा विकसित करणे, विद्युतीकरण व संरक्षक भिंत बांधण्याचे आराखड्यात नमूद आहे; पण यांपैकी काहीही झाले नसून संरक्षण भिंतीऐवजी तार मारून संरक्षणाचा प्रयत्न केला आहे.
मेघडंबरीला
‘जीएसटी’चा फटका
समाधिस्थळाच्या चबुतºयावर सुमारे अडीच टन ब्रॉँझ धातूने तयार करण्यात येणाºया मेघडंबरीचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी सुमारे १७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे; पण ही मेघडंबरी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तिला सुमारे साडेतीन लाख रुपये ‘जीएसटी’चा फटका बसत आहे. या मेघडंबरीवर कलाकुसरीचे काम करण्यात येत आहे.

Web Title: Do not forget about Shahu Samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.