शेतकऱ्यांना निराधार करू नका
By Admin | Updated: July 24, 2016 01:02 IST2016-07-24T00:56:28+5:302016-07-24T01:02:06+5:30
‘एन. डी. पाटील यांचा सदाभाऊंना सल्ला : समित्यांसह शहरात ‘शेतकरी कट्टा’

शेतकऱ्यांना निराधार करू नका
कोल्हापूर : नियमन मुक्तीचा निर्णय घेतला; पण बाजार समित्यांमध्ये माल लावायचा कोठे? या समस्येमुळे शेतकरी गोंधळला असून, त्याला निराधार करू नका. जरा नजर ठेवा, समित्यांमधील मोकळ्या जागा मालासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असा सल्ला ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिला. ही अडचण सरकारच्या लक्षात आली असून, समित्यांसह शहरातील जागा अधिगृहीत करून त्या शेतकरी कट्ट्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
राज्यमंत्री खोत यांनी शनिवारी सायंकाळी प्रा. पाटील यांच्या रुईकर कॉलनी येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये बाजार समिती, शेतकरी, व्यापारी व सरकारची भूमिका यांवर सविस्तर चर्चा झाली. फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्याबद्दल सरकारचे कौतुक करीत प्रा. पाटील म्हणाले, आता सरकारची जबाबदारी वाढली असून नवीन वाटेवरून जाताना शेतकरी गोंधळला आहे. समितीमध्ये माल लावायचा कोठे? विकायचा कसा? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. यासाठी समित्यांमधील मोकळ्या जागा त्यांच्यासाठी राखीव करून द्या. इतर राज्यांतील समित्यांमध्ये कशी व्यवस्था आहे, याच्या अभ्यासासाठी समिती नेमली असून, समित्यांमध्ये ‘शेतकरी कट्टा’ उभा करण्याचा मानस असल्याचे खोत यांनी सांगितले. मुंबईमधील सामाजिक, गृहनिर्माण संस्थांना शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी जागा देण्याबाबत आवाहन केले आहे. त्यानुसार बोरीबंदर महापालिकेसह व मुंबई जिल्हा बॅँकेच्या ५३ शाखांच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भगवान काटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रेठरे धरणची सभा
अन् उडदाचे ऊटे
उभय नेत्यांची चर्चा रंगली असताना भाऊंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘बी. आर.’ मास्तरांच्या प्रचारासाठी आम्ही दोघे एकत्र होतो. डोंगर चढून रेठऱ्याकडे जाताना आमच्या आईने गूळ, शेंगा आणि उडदाचे ऊटे दिले होते. दाजी, तुम्हाला आठवते काय?’ असे भाऊंनी विचारले, यावर ‘उडदाच्या उट्याबरोबर वरण्याची भाजी ठरलेली असायची!’ असे हसत- हसत प्रा. पाटील यांनी उत्तर दिले.
भीष्माचार्यांच्या दर्शनाने हत्तीचे बळ
प्रा. पाटील यांचे पाय धरून आशीर्वाद घेताना खोत म्हणाले, ‘दाजी हे चळवळींचे भीष्माचार्य आहेत. त्यांचा आशीर्वाद घेऊन वाटचाल करावी, असे वाटत होते. आता त्यांच्या दर्शनाने सरकारमध्ये काम करताना हत्तीचे बळ येणार आहे. पण दाजी, तब्येतीकडे लक्ष द्या आणि असाच आशीर्वाद कायम ठेवा.’