पाणी पिताय ना ; मग काळजी घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:01+5:302021-09-09T04:29:01+5:30
दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याचे प्रमाण विशेषत: पावसाळ्यात अधिक असते. पावसाळ्यात नदीचे पाणी अधिकच दूषित झालेले असते. त्यामुळे महानगरपालिका ...

पाणी पिताय ना ; मग काळजी घ्या !
दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याचे प्रमाण विशेषत: पावसाळ्यात अधिक असते. पावसाळ्यात नदीचे पाणी अधिकच दूषित झालेले असते. त्यामुळे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या पाणीशुद्धिकरणाच्या प्रक्रियेवर मर्यादा येतात. शुद्ध पाण्याच्या निकषांप्रमाणे शुद्धिकरणाची प्रक्रिया होत नाही. परिणामी नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता असते.
बऱ्याच वेळा सार्वजनिक तसेच खासगी वितरण नलिका फुटलेल्या असतात, त्यांना गळती लागलेली असते. त्याची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. त्यामुळे वितरण नलिकेतून दूषित पाणी मिसळून ते थेट घरापर्यंत पोहोचते. नागरिकांचा हा निष्काळजीपणा आजारपणावर उठतो. त्यामुळे दैनदिन गरज भागविताना शुद्ध पाणी पिण्यावर भर द्यायला पाहिजे. सध्या कोल्हापूर शहरात मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी तो शुद्ध होईलच याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे पाणी पिताय ना, मग पुरेश काळजी घ्यायला पाहिजे.
- दूषित पाण्यामुळे होणारे आजार -
दूषित पाणी प्यायल्यामुळे माणसांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होतात. दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, अमिबा, टायफॉईड यासारखे पाच प्रमुख आजार होतात. आजार तसे साधे वाटत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे कधी कधी महागात पडू शकते. त्यामुळे वेळीच आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून उपचार करवून घेणे आवश्यक असते.
- अशी असतात आजाराची लक्षणे -
गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, अमिबा, टायफॉईड यासारखे आजार झाल्यास रुग्णांना जुलाब, उलट्या होतात. ताप येतो, पोटात दुखायला लागते, लिव्हरला सूज येते, अशक्तपणा येतो, अपचन होते, भूक मंदावते, आतड्यांना सूज येण्याची शक्यता असते. शौचाद्वारे रक्त पडते, शरीरातील कॅल्शियम कमी होते.
- पाणी उकळून प्यायलेले बरे !
ज्यावेळी आपल्याकडे नळाला गढूळ, दुषित तसेच दुर्गंधीयुक्त पाणी येते, त्यावेळी ते पिण्यास अयोग्य असते. असे दूषित पाणी पिणे टाळले पाहिजे. अगदीच अडचणी असतील तर पाणी १०० अंश सेल्सियस उष्णतेपर्यंत चांगले उकळून गाळून पिणे आवश्यक ठरते. पाणी उकळल्यावर त्यातील बॅक्टेरिया मरतात. उकळलेले पाणी गार करून पिले तरी चालते.
- कोल्हापूरकरांना दररोज १३५ लिटर पाणी -
कोल्हापूर शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार साडेपाच लाख इतकी आहे; परंतु आता ती सव्वासहा लाखांपर्यंत पोहोचली आहे. महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभाग शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी शहरातील तीन जलशुद्धिकरण केंद्रातून रोज सरासरी १२० ते १३० एम.एल.डी. पाणीपुरवठा करत आहे. प्रतिदिन प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी दिले जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे.