‘लिंकिंग’साठी अडवणूक नको
By Admin | Updated: February 7, 2015 00:09 IST2015-02-06T23:32:04+5:302015-02-07T00:09:20+5:30
विवेक आगवणे : तातडीने ‘झिरो बॅलेन्स’ अकाऊंट उघडून द्या

‘लिंकिंग’साठी अडवणूक नको
कोल्हापूर : आधारकार्ड व बँक खाते क्रमांकाशी शिधापत्रिका लिंकिंग करण्याच्या कामात कोणीही दिरंगाई अथवा विलंब करू नये. कोणत्याही परिस्थितीत हे काम ३१ मार्चपर्यंत संपवायचे आहे. हे काम शासकीय असल्याने त्यात कोणी अडथळे आणत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत बोलताना दिला.
शिधापत्रिका आधारकार्ड व बँक खात्याशी लिंकिंग करण्याची मोहीम सध्या जिल्ह्यात सुरू असून, त्याच्या प्रबोधनासाठी शुक्रवारी येथील शाहू स्मारक भवनात महसूल कर्मचारी, रेशन दुकानदार, बँक अधिकारी, दुकानदार संघटनांचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये आगवणे बोलत होते.
शिधापत्रिका लिंकिंग करण्याचे काम सुरू असल्याने शहरातील कोणत्याही बॅँकेत कोणी नागरिक गेला आणि मला ‘झिरो बॅलेन्स’ खाते उघडायचे आहे, असे सांगितले तर संबंधित बँक अधिकाऱ्यांनी त्यास तत्काळ खाते उघडून द्यावे. जर ते देण्यास टाळाटाळ केली तर संबंधित बॅँकांविरोधात कारवाईचा अहवाल शासनाकडे पाठवावा लागेल. रेशनिंग दुकानदारांनी शिधापत्रिका लिंक करण्याचे काम ३१ मार्चच्या आत करायचे आहे. या कामात विलंब तसेच दोष राहू नयेत याची काळजी घ्यावी, असे आवाहन आगवणे यांनी केले.
लिंकिंग योजनेमुळे नव्वद टक्के दुकानदार हवालदिल झाले आहेत. आपल्या अस्तित्वाचे काय, आपल्या फायद्याचे काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत; परंतु कोणीही हवालदिल न होता योजना यशस्वी करण्याचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन दुकानदार संघटनेचे चंद्रकांत यादव यांनी यावेळी केले. साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे, अन्नधान्य वितरण अधिकारी डी. एम. सणगर यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी, दुकानदार उपस्थित होते.
बैठकीतील सूचना
झिरो बॅलेन्स खाते उघडून देताना बँकांचा अडथळा खपवून घेणार नाही
बँक खाते उघडण्यासाठी आधारकार्डची सक्ती करू नये
पासबुकला उशीर लागणार असेल तर खातेदाराला अकौंट क्रमांक लिहून द्यावा
दुकानदारांनी आपल्या अस्तित्वाचे या मानसिकतेतून बाहेर पडावे
शासकीय काम असल्याने अडथळा अथवा दिरंगाई केल्यास कारवाई