पाईपलाईन मार्गात बदल नका

By Admin | Updated: November 25, 2014 23:52 IST2014-11-25T23:42:47+5:302014-11-25T23:52:03+5:30

विरोधाची शक्यता : शेतकऱ्यांत अस्वस्थता; इस्पुर्लीऐवजी भोगावती मार्गे

Do not change the pipeline path | पाईपलाईन मार्गात बदल नका

पाईपलाईन मार्गात बदल नका

राधानगरी : कोल्हापूरला काळम्मावाडी धरणातून नेण्यात येणाऱ्या पाण्याच्या थेट पाईपलाईनचा मार्ग बदलल्याने राधानगरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेने हा मार्ग इस्पुर्लीऐवजी भोगावती असा बदलला आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या मार्गाला विरोध होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली ही योजना दोन वर्षांपूर्वी मंजूर झाली. दूधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरणातून नैसर्गिक उताराने थेट पाईपलाईनमधून कोल्हापूरजवळ पाणी नेऊन तेथून ते शहरात पुरविण्यात येणार आहे. अनेक वर्षांत अडथळ्यांमुळे रेंगाळलेली ही योजना मंजूर झाली असली तरी ती राबविताना असंख्य अडचणी निर्माण होणार आहेत.
धरणापासून सुरू होणाऱ्या मोठमोठ्या टेकड्या, डोंगर पार करावे लागणार आहेत. पूर्वी या पाईपचा मार्ग काळम्मावाडी-तुरंबे-इस्पुर्लीमार्गे कोल्हापूर असा होता. मात्र, हे अंतर वाढते. तसेच मोठा घाट पार करावा लागतो, म्हणून मार्ग बदलण्यात आला आहे. आता मांगेवाडी-खिंडीव्हरवडे ते भोगावतीमार्गे कोल्हापूर अशा मार्गाची पाहणी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या बाजूने ही पाईप टाकण्यात येणार आहे. या मार्गावर अगदी रस्त्याला खेटून असलेली राधानगरी तालुक्यातील १७ व करवीर तालुक्यातील आठ, अशी २५ गावे लागतात.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मध्यापासून किमान पंधरा मीटर अंतर सोडून पाईप टाकावी, असे कळविले आहे. काही ठिकाणी इतकीही जागा शिल्लक नाही. अगदी रस्त्याबरोबर घरे व व्यावसायिक इमारती आहेत. अशा हजारो इमारतींना अडथळा होणार आहे. ही पाईप काही ठिकाणी जमिनीवरून व काही ठिकाणी जमिनीखालून असणार आहे. जमिनीवर पाईप असेल तेथे ये-जा करण्यास अडचण होणार आहे, तर शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे नळ जमिनीखाली मोठ्या संख्येने आहेत. तेथेही अडचण होणार आहे. असंख्य झाडांची तोड होणार आहे. काही मंदिरे हटवावी लागणार आहेत. पाईपचे अंतर सुमारे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
राधानगरी-कोल्हापूर हा आंतरराज्य मार्गाचा भाग आहे. भविष्यात कधीकाळी हा मार्ग चारपदरी करावा लागणार आहे. त्याचा विचार आताच करावा लागणार आहे; अन्यथा रस्ता रुंदीकरणावर मर्यादा येणार आहेत. रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या जमिनी संपादित करण्याचा पर्याय पुढे आल्यास शेतकऱ्यांमधून विरोध होण्याची शक्यता आहे.


पर्यायी मार्गाचा विचार व्हावा
योजनेच्या पाईपचा मार्ग रस्त्याऐवजी धरणाच्या डाव्या कालव्याच्या बाजूने न्यावा, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचविले होते. पाटबंधारे विभागाने कालव्यासाठी पूर्वी भरपूर जमीन संपादित केली आहे. धरण ते इस्पुर्लीपर्यंत कालवा आहे. तेथून रस्त्याच्या बाजूने पाईप नेल्यास एकही गाव रस्त्याच्या बाजूला लागत नाही. हे अंतर काही प्रमाणात वाढणार असले तरी यामुळे बाधित होणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे.

Web Title: Do not change the pipeline path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.