जिल्ह्याचा स्वाभिमान दुसऱ्याच्या दावणीला बांधू नका!
By Admin | Updated: April 22, 2015 00:25 IST2015-04-21T23:24:10+5:302015-04-22T00:25:23+5:30
उदयनराजे गरजले : रामराजेेंच्या ‘बंद लखोटा’ परंपरेवर केली जहाल टीका

जिल्ह्याचा स्वाभिमान दुसऱ्याच्या दावणीला बांधू नका!
सातारा : सातारा जिल्ह्यातील मातीत प्रचंड ऊर्जा आहे. येथील जनता लोकप्रतिनिधींना आपल्या स्वाभिमानासाठी निवडून देते. आपला स्वाभिमान दुसऱ्या जिल्ह्याच्या दावणीला बांधण्यासाठी नाही, अशी जहाल टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी केली. जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण व इतर मतदारसंघातील मतदारांची बैठक सायंकाळी उशीरा घेतली होती. या बैठकीत ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, ‘दुसऱ्याला बाजूला सारुन राजकारण करण्याची परंपरा अनेक दिवसांपासून रुढ होत चालली आहे. मला जिल्हा बँकेत निवडून जाऊन कोणताही लाभ घ्यायचा नाही. मला कर्ज काढण्याची गरज नाही. पण जिल्ह्याचा स्वाभिमान जपण्यासाठी मला हे करावे लागत आहे. या प्रस्थापित मंडळींवर ‘चेक’ बसण्यासाठी जो उमेदवार योग्य असेल त्याला माझा पाठिंबा राहिल. लोकशाहीत प्रत्येकाला लढण्याचा हक्क आहे. त्यामुळे नव्या मंडळींना संधी द्यावी, अशी माझी भूमिका सुरुवातीपासूनच राहिली आहे. मात्र, ‘त्यांना’ ती मान्य नाही. त्यामुळेच माझ्याविषयी त्यांना राग आहे.’गेल्या पाच वर्षांतील त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी त्यांना भीती होती, म्हणूनच बंद लखोट्यातून आलेले निर्णय माजी पालकमंत्री सांगत होते. हे बंद लखोट्यात काय लिहिलंय, हे मला दाखवा, असा माझा आग्रह होता. मात्र, त्यांना तो त्यांना मान्य नव्हता. या सर्वांना मान्य होतं की मी मनमानी कारभार चालू देणार नाही. त्यामुळेच मला जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीत घेतलं गेलं नाही. भांडल्याशिवाय काहीच मिळणार नाही, हे मला माहित झालं आहे. त्यामुळे रेल्वेचे दोन ट्रॅकसाठी साडेचार कोटी मंजूर करुन आणले. कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गासाठीही मी पाठपुरावा केला आहे. वर्षानुवर्षे खुर्चीला चिकटून बसणाऱ्यांनी काय केले आहे, असा सवालही उदयनराजेंनी यावेळी उपस्थित केला.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रवी साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, अॅड. डी. जी. बनकर, सुनील काटकर, संभाजीराव पाटणे, पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत पडवळ, नाना शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मीच माझा पीए, ड्रायव्हर, क्लिनर..
माझ्या आणि जनतेच्या मध्ये कोणी नाही. मीच माझा पीए, ड्रायव्हर आणि क्लिनरही आहे. त्यामुळे जे काही प्रश्न आहेत. ते न डगमगता माझ्यापर्यंत पोहचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
दबाव आणणाऱ्याचा योग्य ‘मान-पान’
माझे नाव घेऊन सामान्य जनतेला वेठीस घेण्याचा प्रकार कोण करत असेल तर ते खपवून घेणार नाही. मला भ्रष्टाचार बिलकूल खपत नाही. कोणी दबाव आणत असेल तर त्याचा योग्य मान, पान, सन्मान करुन त्याचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासनही उदयनराजेंनी उपस्थितांना दिले.