धमक्यांना घाबरू नका, पोलीस तुमच्या मदतीला

By Admin | Updated: July 27, 2015 00:05 IST2015-07-27T00:05:20+5:302015-07-27T00:05:20+5:30

नागरिकांना दिलासा : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस करणार प्रबोधन

Do not be afraid of threats, police help you | धमक्यांना घाबरू नका, पोलीस तुमच्या मदतीला

धमक्यांना घाबरू नका, पोलीस तुमच्या मदतीला

एकनाथ पाटील - कोल्हापूर -आगामी महापालिका निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये उमेदवारांकडून ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा वापर होण्याची शक्यता आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पोलीस दलाच्या वतीने शहरासह उपनगरांत नागरिकांत जागृती निर्माण करण्यात येणार आहे. सशस्त्र संचलनासह कोणाच्याही दमदाटी, धमक्यांना घाबरू नका, पोलीस चोवीस तास तुमच्या मदतीला आहेत, असा दिलासा नागरिकांना दिला जाणार आहे.
महापालिका निवडणूक व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन गेल्या सहा महिन्यांपासून काम करीत आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असून त्यामध्ये सर्व स्तरांवर ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा वापर होण्याची शक्यता आहे. मतदार, सार्वजनिक मंडळे, तालीम संस्था, आदींना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा निवडणुकीत सर्रास वापर केला जाण्याची शक्यता आहे. प्रसंगी दमदाटी, धमक्या आणि दहशतीच्या जोरावरही मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी काही उमेदवारांचे आतापासूनच प्रयत्न सुरू आहेत.
काही उमेदवार सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात असून, याचा परिणाम कायदा-सुव्यवस्थेवर होणार असल्याचा इशारा गुप्तहेर विभागाने पोलीस प्रशासनास दिला आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी क्राइम बैठकीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह टोळ्यांंच्या हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश देत इच्छुक उमेदवार गुन्हेगारांच्या संपर्कात आहेत का, याची गोपनीय माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईबरोबरच गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी पोलीस ठाण्यातील गोपनीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. शहरासह उपनगरांतील हालचालींवर पोलिसांनी ‘विशेष वॉच’ ठेवला आहे.
शहर व उपनगरांत सशस्त्र संचलन करून कट्टा बैठका घेण्यात येणार आहेत. मतदानासाठी पैशांचा किंवा भेटवस्तूंचा मोह टाळावा. गुन्हेगारांचा वावर दिसल्यास पोलिसांना माहिती द्या. मतदानासाठी कोणी उमेदवार किंवा गुन्हेगार धमक्या देत असेल किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर घाबरू नका. पोलीस तुमच्या मदतीला चोवीस तास आहेत, असे प्रबोधन करण्यात येणार आहे.

१३ टोळ्यांसह २०० गुंडांवर कारवाई
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आर. सी. गँग, एस. टी. गँग, यू. के. ग्रुपसह १३ टोळ्या व २०० पेक्षा जास्त गुंडांचे हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरला लागून असलेल्या सांगली, सातारा, रत्नागिरी व सोलापूर या चार जिल्ह्यांबाहेर त्यांची रवानगी करण्यात यावी, अशी विनंती केली गेली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आपली उचलबांगडी होणार असल्याची चाहूल लागताच बहुतांश गुन्हेगारांनी हद्दपारीच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी पोलीस ठाण्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत फिल्डिंग लावली आहे.

महापालिका निवडणूक लढविण्यासाठी काही गुन्हेगार सक्रिय आहेत. त्याचबरोबर काही इच्छुक उमेदवारही गुन्हेगारांच्या संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणुकीच्या धर्तीवर कोणाच्याही धमक्यांना घाबरू नका, पोलीस चोवीस तास तुमच्या मदतीला आहेत, असा संदेश नागरिकांना दिला जाणार आहे.
- डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक

Web Title: Do not be afraid of threats, police help you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.