हद्दवाढीचा वाद नको, तोडगा काढा

By Admin | Updated: October 17, 2014 23:51 IST2014-10-17T23:48:29+5:302014-10-17T23:51:50+5:30

कार्यशाळा : शहर आणि ग्रामीण अशा वादाऐवजी सामोपचाराची गरज

Do not argue too much, get rid of the solution | हद्दवाढीचा वाद नको, तोडगा काढा

हद्दवाढीचा वाद नको, तोडगा काढा

कोल्हापूर : एकीकडे हद्दवाढीमुळे ग्रामीण भागातील जनतेवर मोठा अन्याय होईल असे; तर दुसरीकडे हद्दवाढ झाल्यास शहराचा चौफेर विकास होणार असल्याचे चित्र सध्या रंगविले जात आहे. हद्दवाढीमुळे समाविष्ट होणाऱ्या गावांच्या भौगोलिक रचनेबरोबर सांस्कृतिक व सामाजिक ठेवणही लोप पावण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे, तर हद्दवाढ रखडल्याने शहराचा विकासही खुंटल्याची भावना शहरवासीयांत आहे. अशा परिस्थितीत ‘शहर व ग्रामीण’ असा वाद न करता सुसंवादाने विषयावर तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत महावीर महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत उमटले.
शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत महावीर महाविद्यालयात ‘कोल्हापूर शहर : भौगोलिक अभ्यास’ या विषयावर कार्यशाळा गुरुवारी झाली. कार्यशाळेचे उद्घाटन महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. बी. कणसे होते. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सहभागी मान्यवरांचे मत

हद्दवाढीमुळे ग्रामीण जनतेवर अन्याय होईल, असा गैरसमज आहे. हद्दवाढीमुळे जास्त निधी उपलब्ध होणार आहे. हद्दवाढीमुळे शहराबरोबरच आजूबाजूच्या परिसराचाही विकास होणार आहे. समाविष्ट होणाऱ्या गावांना घेऊन जाण्याची हमी शहरवासीयांतर्फे देत आहे. तृप्ती माळवी- महापौर

हद्दवाढ न झाल्याने शहराचा विकास खुंटला, हे साफ खोटे आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मोठा विकासनिधी मिळू शकलेला नाही. केंद्र व राज्य सरक ार यांनी संघर्षाशिवाय कोल्हापूरला काहीच दिलेले नाही. लोकसंख्येची अट शिथिल करण्यात राज्यकर्ते कमी पडले.
-संपत पवार-पाटील, माजी आमदार

शहराची नैसर्गिक व स्वाभाविक वाढ होण्यासाठी हद्दवाढ गरजेची आहे. हद्दवाढीमुळे कृषिक्षेत्राचा नाश होईल, असे म्हणणाऱ्यांचेच अकृषिक किंवा बिगरशेती परवान्यासाठी सर्वाधिक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आहेत. हद्दवाढीमुळे ग्रामीण भागात आरोग्य, पाणी व रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा मिळतील.
- अ‍ॅड. बाबा इंदुलकर
उदारीकरणामुळे शहरकेंद्रित विकासाची संकल्पना पुढे आली आहे. शहर आणि भांडवलदार यांचा विकास हेच सरकारचे धोरण आहे. हद्दवाढ नफ्यासाठी की गरजेसाठी हा विचार करून सामोपचाराने तोडगा काढणे गरजेचे आहे.- कॉ. चंद्रकांत यादव

Web Title: Do not argue too much, get rid of the solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.