पर्यटनवृद्धी करू

By Admin | Updated: November 12, 2014 00:27 IST2014-11-11T23:58:41+5:302014-11-12T00:27:34+5:30

धनंजय महाडिक : धार्मिक स्थळे, धबधबे, हिलस्टेशन विकसित करणार

Do flourish | पर्यटनवृद्धी करू

पर्यटनवृद्धी करू

कोल्हापूर : जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिले आहे. इथे धार्मिकस्थळे, किल्ले, गड, आकर्षक धबधब्यांचे विपुल जलवैभव, लँड टेबल्स, हिलस्टेशन्स आहेत, परंतु ही सर्व ठिकाणे विकसित नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पुरातत्व विभाग, एमटीडीसी यांना सोबत घेऊन जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर आणू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी येथे दिली.
पर्यटनाशी संबंधित घटकांची खा. महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पर्यटनासंदर्भात सादरीकरण झाले.
कोल्हापूर जिल्हा हा निसर्गसंपत्तीने नटलेला आहे. सह्याद्रीच्या रांगा, मसाई पठारसारखे लॅँड टेबल्स, हिरवाईने संपन्न असलेला गगनबावडा परिसर, बर्की, आंबोली, चंदगड, आजरा, आंबा आणि अन्य ठिकाणीही नैसर्गिक धबधबे आहेत. त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिर, जोतिबा मंदिर, आरेचे महादेव मंदिर, नृसिंहवाडी, खिद्रापूर अशी धार्मिक स्थळेही आहेत. भुदरगड, रांगणा, विशाळगड, पन्हाळा यासह अनेक छोटे-मोठे गड-किल्ले आहेत तरीही पर्यटनाच्या नकाशावर जिल्ह्याचे अस्तित्व नगण्य आहे. ही बाब जाणून घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी परिस्थितीमध्ये बदल घडविण्यासाठी पर्यटनवाढीच्या दृष्टीने संबंधित घटकांची बैठक घेतली.
यामध्ये वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांनी जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने असणारी शक्तिस्थळे आणि मर्यादांचे विवेचन केले. त्याचबरोबर सादरीकरणाद्वारे अनेक संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक व्ही. एन. कांबळे यांनी खात्याच्या अटी आणि उपलब्ध सोयी-सुविधा याबाबत माहिती दिली. उद्योजक मोहन मुल्हेरकर आणि उज्ज्वल नागेशकर यांनी प्रत्यक्ष गुऱ्हाळघराला पर्यटकांनी भेटी देण्याची संकल्पना मांडली तसेच कोल्हापुरी चप्पल तयार होणाऱ्या ठिकाणांचा यात समावेश करता येईल, असेही सांगितले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी भवानी मंडप इथे सांस्कृतिक ठेवा जतन करून तिथे ‘हेरिटेज वॉक’ तयार करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले.
कोल्हापूरची पर्यटनवाढीची क्षमता प्रचंड असली तरी सध्या फारशा सोयी-सुविधा नसल्याने त्याला मर्यादा येत असल्याचे निरीक्षण खा. महाडिक यांनी नोंदविले.
यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी उत्तम कांबळे, सचिन शानभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव, हॉटेल-मालक संघाचे सिद्धार्थ लाटकर, योगेश कुलकर्णी, मिलिंद धोंड, यशोराज पाटील आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)

Web Title: Do flourish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.