कोल्हापुरात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:14+5:302021-07-21T04:18:14+5:30
कोल्हापूर : मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य समितीने राज्य शासनाकडे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कोरोना संसर्ग नियंत्रणात ...

कोल्हापुरात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करा
कोल्हापूर : मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य समितीने राज्य शासनाकडे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नसल्याने संपूर्ण लॉकडाऊन करण्याची शिफारस केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर प्रशासनाची पाठ थोपटून जाताना जिल्ह्याची स्थिती गंभीर नसल्याचा निर्वाळा दिलेल्या समितीला तिथे गेल्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचा साक्षात्कार झाला की काय, असा प्रश्न आता यंत्रणेलाही पडला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी येत असून, रुग्णसंख्या हजाराच्या आत आल्याने संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यताही धूसरच आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती गंभीर होती. त्यामुळे मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्य समितीने जिल्ह्याचा दौरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तीन तासांच्या बैठकीनंतर त्यांनी जिल्हा-महापालिका प्रशासनाचे कौतुक करत कोल्हापूरची स्थिती गंभीर नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या विधानाशी मी सहमत नसल्याचे सांगितले.
मागील आठवड्यापासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असून, तो ९.८ टक्के इतका आहे. सध्या रुग्णसंख्या हजाराच्या आत आली आहे आणि मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा स्तर ३ मध्ये समावेश झाला असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांनादेखील सोमवारपासून सकाळी ७ ते ४ या वेळेत व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. आता कुठे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आणि व्यवहार सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना केंद्रीय समितीने कोल्हापूर व सांगलीत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची शिफारस केल्याने पुन्हा लोकांच्या छातीत धस्स झाले. राज्याच्या आरोग्य विभागाने मात्र आम्हाला समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे म्हटले आहे.
---
महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, समितीने प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले आणि काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या. मात्र, त्यात लॉकडाऊनचा विषय चर्चेत आला नव्हता. महापालिका प्रशासनाकडे तसे कोणतेही अधिकृत निर्देश आलेले नाहीत.
----