डीएनए व सायबर लॅबमुळे गुन्ह्यांची उकल होण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:44+5:302021-07-14T04:28:44+5:30
कोल्हापूर : सध्या सायबर गुन्हे वाढले असून डीएनए, संगणक गुन्हे आणि ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण लॅबमुळे त्याची उकल होण्यास ...

डीएनए व सायबर लॅबमुळे गुन्ह्यांची उकल होण्यास मदत
कोल्हापूर : सध्या सायबर गुन्हे वाढले असून डीएनए, संगणक गुन्हे आणि ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण लॅबमुळे त्याची उकल होण्यास तसेच सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमधील संगणकीय गुन्हे कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली.
प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीमध्ये डीएनए, सायबर तसेच ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, एमजीपीचे अधीक्षक अभियंता व्ही. एल. कुलकर्णी, सहायक संचालक दीपक जोशी, श्रीकांत लादे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, पीडित व्यक्तीच्या न्यायदान प्रक्रियेत लॅबचे महत्त्वाचे योगदान ठरते. त्यासाठी सॅम्पल कलेक्शन गोळा करणे महत्त्वाचे असते. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून यासंदर्भात बँकांना निर्देश देण्यासाठी बैठक घ्यावी.
यावेळी त्यांनी कसबा बावडा येथील बझार लाईनमध्ये ज्या २४० क्वाॅर्टरची उभारणी प्रस्तावित आहे. त्यातील काही क्वॉर्टर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीसाठी राखीव ठेवण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल. या लॅबच्या ठिकाणी लॅबशी संबंधित व्यक्तीवगळता इतरांना प्रवेश दिला जावू नये तसेच या विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे आश्वासन दिले.
न्यायिक व तांत्रिक विभागाचे महासंचालक संदीप बिश्नोई यांनी प्रास्ताविक केले. प्रयोगशाळेचे संचालक के. व्ही. कुलकर्णी यांनी सध्या राज्यात ८ डीएनए व इतर ५ मिनी लॅब कार्यरत असून कोल्हापुरात सुरू झालेल्या या लॅबमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली या जिल्ह्यांतील सायबर व इतर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मदत होईल, असे सांगितले. उपसंचालक रा. ना. कुंभार यांनी आभार मानले.
---
फोटो नं १२०७२०२१-कोल-सायबर लॅब
ओळ : कोल्हापुरातील प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीमध्ये डीएनए, सायबर तसेच ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण विभागाचे उद्घाटन सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महासंचालक संदिप बिश्नोई, व्ही. एल. कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.