सीमेवरील जवानांसमवेत अंधांची दिवाळी
By Admin | Updated: November 22, 2015 00:46 IST2015-11-22T00:46:08+5:302015-11-22T00:46:43+5:30
आगळावेगळा उपक्रम : हुसेनीवाला सीमेवर साजरी केली दिवाळी

सीमेवरील जवानांसमवेत अंधांची दिवाळी
चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूर
दिवाळी कुटुंबीयांसमवेत साजरी करण्यातच आपण धन्यता मानतो मात्र सतीश नवले हे गेल्या तेरा वर्षा$ंपासून सीमेवरील जवानांसमवेत दिवाळी साजरी करीत आहेत. ते स्वत: अंध असून यंदाही त्यांनी आपल्या तीन अंध सहकाऱ्यांसमवेत पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला सीमेवर सुरक्षा दलाच्या जवानांसमवेत दिवाळीचा आनंद लुटला.
प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेतर्फे सतीश नवले दर दिवाळीला सीमेवरील जवानांसमवेत ‘वीर वंदन’ हा कार्यक्रम करतात. सणवार आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो. सीमेवरील जवान मात्र या उत्सव काळात कुटुंबीयांपासून लांब राहून ते देशाचे संरक्षण करीत असतात. एक नागरिक म्हणून आपणही त्यांचे काही देणे लागतो. १९९९ मध्ये नववीत असताना भारत-चीन युद्धावरचे पुस्तक वाचून मला ही कल्पना सुचली. २००३ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिला मूर्त रूप दिले. पहिली सहा वर्षे मी एकटाच सीमेवर जात होतो. २००९पासून अंध आणि डोळस मित्रांचा एक ग्रुप तयार केला आणि त्यांच्या समवेत जाऊ लागलो, असे तो सांगतो.
मिलिंद कांबळे (कॉर्पोरेशन बँक पुणे), महाराष्ट्र बँक अधिकारी प्रवीण उछवा (चाळीस गाव, जि. जळगाव), पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील बी.ए. भाग तीनची विद्यार्थिनी वर्षा वीर हे तीन अंध आणि आय. टी. इंजिनीअर सुजय कुलकर्णी आणि पुण्यातील एम.सी.ए.चा विद्यार्थी समीर शेख या दोन डोळस मार्गदर्शकांसमवेत भाऊबिजेदिवशी यंदा हुसेनीवाला सीमेवर सतीश पोहोचला. तेथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसमवेत दोन तासांचा दिवाळी भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे भारत-पाकिस्तान युद्धाला ५0 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लहान-मोठे आकाराचे ५0 राष्ट्रध्वज तेथे देण्यात आले. हे ध्वज पुण्यातील जागृती सोशल फाउंडेशनने दिले होते. तसेच कोल्हापुरातील वायल्डर मेमोरिअल चर्चने जवानांसाठी खास दिवाळीचा फराळ दिला होता. या भेटी जवानांना देण्यात आल्या. या वेळी सीमा सुरक्षा दलाचे असि. कमांडंट भूपेंद्र सिंग, फिरोजपूरचे पोलीस अधीक्षक केतन बजरंग पाटील यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि जवान उपस्थित होते. आपल्याला घरी कधीच दिवाळी साजरी करायला मिळत नाही; पण तुमच्यामुळे आम्हाला दिवाळीचा आनंद लुटता आला, अशा भावना व्यक्त करताना अनेक जवानांचे डोळे भरून आले होते. आम्ही अंध असलो तरी त्यांच्या स्पर्शातून आणि बोलण्यातून आम्हाला ते जाणवत होते, असे सतीश सांगतात.
आपल्याला यासाठी सरहद्द संस्थेचे संजय नहार, नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर, पुष्पक सिमेंटचे सुनील शहा यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.
कोण आहेत सतीश नवले?
मूळचे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरेचे आणि सध्या कोल्हापुरात राहत असलेल्या सतीश नवले यांनी ‘कम्युनिटी रेडिओ चालविणारा देशातील पहिला अंध’ ठरण्याचा बहुमान मिळविला आहे. सांगली जिल्ह्यातील येरळावाणी कम्युनिटी रेडिओ या केंद्राचा इन्चार्ज म्हणून त्यांनी सुमारे दीड वर्ष काम केले. यानंतर अंधांसाठी अंधांचे ब्रेलवाणी हे एक स्वतंत्र कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू केले.
नेत्रदानाचा संकल्प
दीपोत्सवाचा कार्यक्रम खूपच भारावून टाकणारा होता. या कार्यक्रमात सुमारे १00 जवानांनी नेत्रदानाचा संकल्प सोडला, असे सतीश नवले यांनी सांगितले.