जिल्हाभर ऊन-पावसाचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:04+5:302021-09-10T04:31:04+5:30
कोल्हापूर: अतिवृष्टी होण्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाच्या चिंध्या उडवत पावसाने गुरुवारी दिवसभर बऱ्यापैकी विश्रांती घेतली. कधी येणारी एखादी सर, ...

जिल्हाभर ऊन-पावसाचा खेळ
कोल्हापूर: अतिवृष्टी होण्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाच्या चिंध्या उडवत पावसाने गुरुवारी दिवसभर बऱ्यापैकी विश्रांती घेतली. कधी येणारी एखादी सर, अन्यथा उघडीप असाच ऊन-पावसाचाच खेळ जिल्हाभर रंगला. या उघडिपीमुळे मात्र गणेशोत्सवाच्या खरेदीला उधाण आले. गुरुवारी दिवसभर कमी-अधिक प्रमाणात असेच वातावरण राहणार आहे.
जिल्ह्यात मंगळवारी पावसाने जोरदार मुक्काम केला. दिवसरात्र पावसाने मुक्काम ठोकल्याने बुधवारी दुपारी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. पाणलोट क्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी दुपारपासून पावसाने पुन्हा उघडीप घेतली. गुरुवारी सकाळी पुन्हा जोरदार सरी कोसळल्या, त्यानंतर मात्र संध्याकाळपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा ढग उतरेल तिथे पाऊस झाला. सरासरी १२. ३ मि.मी. पाऊस झाला. यात सर्वाधिक ५० मि.मी. पाऊस गगनबावड्यात, तर २९ मि.मी. पाऊस चंदगड आणि शाहूवाडीत झाला आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे खुले झालेल्या दोनपैकी तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा सकाळी बंद झाल्याने भोगावती नदी पात्रात होणारा विसर्ग कमी झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही. तथापि, मंगळवारी झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ. भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, तर ‘कुंभी’वरील शेणवडे असे एकूण १४ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळची पाणीपातळी २४ फूट ११ इंचावर असल्याने अजून नदी पात्राच्या आतच आहे.