जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

By Admin | Updated: May 10, 2015 00:48 IST2015-05-10T00:44:26+5:302015-05-10T00:48:42+5:30

गारपीट : सर्वत्र वळवाच्या सरी; जानराववाडीत वीज पडून शेतकरी ठार

The district was overwhelmed with windy rain | जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

सांगली : सांगली-मिरज शहरांसह संपूर्ण जिल्ह्याला शनिवारी वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. मिरज तालुक्यातील जानराववाडीत वीज पडून एक ठार झाला. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. दिवसभर उकाडा वाढला असताना सायंकाळी वळीव पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
जिल्हाभरात दुपारनंतर प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला होता. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
मिरज : मिरज व परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जानराववाडीत शेतात काम करणाऱ्या विलास सीताराम नाईक (वय ५०) यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. खटावमध्ये पल्लाप्पा शिंगाडे यांच्या गोठ्यावर वीज पडून गाय आणि चार शेळ्यांचा मृत्यू झाला. गावातील परसू पाटील यांच्या घरातील पत्र्याचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेले. वादळी वाऱ्याने तालुक्यातील अनेक गावांत घरांचे, छपरांचे नुकसान झाले. मिरजेत पावसाने रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. जोरदार वाऱ्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
इस्लामपूर : इस्लामपूर शहर व परिसरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पाच वाजता दहा मिनिटांसाठी व त्यानंतर सातच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस छोट्या गारांसह पडला. वाऱ्याचा जोर असल्याने पावसाची गती मध्यम राहिली. सुरुवातीला छोट्या आकाराच्या गारा पडल्या. सायंकाळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस अर्धा-पाऊण तास एकसारखा पडत होता. कासेगाव, वाटेगाव परिसरात तासभर सरी कोसळल्या. आष्टा व परिसरात सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. मागील चार दिवसांपासून दिवसभर उन्हाचा जोरदार तडाखा व सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. पावसाळी वातावरणासह विजेचा खेळखंडोबाही चालू आहे.
जत : शहर आणि परिसरात सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पंधरा मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, डाळिंब, द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर उन्हाळी कापूस, भुईमूग ऊस या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. मागील चार-पाच दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती, तर दोन-तीन दिवसांपासून सायंकाळी हवेत ढग जमा होत होते; परंतु पाऊस पडत नव्हता. शनिवारी सायंकाळी पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले असले तरी, खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी शेतीची मशागत करता येणार आहे. तालुक्याच्या दक्षिण-उत्तर भागात हा पाऊस झाला असून पूर्व -पश्चिम भागात पाऊस झाला नाही.
तासगाव : तासगाव शहरासह परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर विजेच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. शहरासह येळावी, कवठेएकंद, कुमठे, मणेराजुरी, बोरगाव, विसापूर, हातनूर परिसरात जोरदार पाऊस झाला. सावळज परिसरात वादळी वाऱ्याचा जोर होता. मात्र, तुरळक प्रमाणात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे रस्त्यावर मोडून पडली. त्यामुळे काही वेळासाठी जनजीवन विस्कळीत झाले.
विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट होऊन पाऊस पडला. पारे, बामणी, चिंचणी, कुर्ली, कार्वे, बलवडी (खा.) परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. आळसंद, वाझर, कमळापूर, भाळवणी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लेंगरे, माहुली व विटा परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वादळी वारे असल्याने आंबा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
पलूस : पलूस तालुक्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाली. वादळी वाऱ्याने पलूस-तासगाव रस्त्यावर झाले पडली.
शिराळा तालुक्यात पुनवत परिसरात गडगडाटासह पाऊस
कडेगाव तालुक्यातील कडेपूर, वांगी, देवराष्ट्रे, चिंचणी, नेवरी, आसद येथे गारा पडल्या. आसदमध्ये झाडे पडली, विजेचे खांब वाकले, तारा तुटल्या. तालुक्यातील बहुसंख्य गावांतील वीजपुरवठा खंडित झाला.

Web Title: The district was overwhelmed with windy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.