जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:09+5:302021-05-05T04:40:09+5:30
कोल्हापूर : मंगळवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या वादळी पावसाने पूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. विजांच्या कानठळ्या बसवणाऱ्या ...

जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले
कोल्हापूर : मंगळवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या वादळी पावसाने पूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. विजांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने आसमंत हादरला. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण होते.
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून रोज कुठे ना कुठे वादळी पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारी मात्र संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी पाऊस झाला. सकाळपासूनच पावसाचा अंदाज येत होता. हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारी अडीचनंतर वातावरण बदलू लागले. ढगांची गर्दी वाढली आणि चार-साडेचारच्यासुमारास जाेरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाने हवेत गारवा निर्माण झाला, तरी सर्वांच्याच उरात धडकी भरवली. जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर शहरात पावसाची वेळ व जोर काहीसा कमी होता. अर्धा तास पाऊस पडला. जिल्ह्यात मात्र सर्वदूर पावसाने हजेरी लावत तापलेल्या धरणीला गारवा दिला.
दरम्यान, या पावसाने उष्म्याने हैराण जनतेला काही काळ दिलासा मिळाला आहे. पुढील चार दिवस असेच जोरदार वादळी पावसाचे असतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.