जिल्हा बँकेतून दूध संस्थांना दहा हजार मिळणार
By Admin | Updated: December 29, 2016 01:18 IST2016-12-29T01:18:59+5:302016-12-29T01:18:59+5:30
‘गोकुळ’शी संलग्न संस्थांना दिलासा : आतापर्यंत १२० कोटी जिल्हा बँकेत, तर १०७ कोटी इतर बँकांत अडकले

जिल्हा बँकेतून दूध संस्थांना दहा हजार मिळणार
कोल्हापूर : ‘गोकुळ’शी संलग्न प्राथमिक दूध संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या माध्यमातून प्रत्येकी दहा हजार रुपये रोकड देण्यात येणार आहे. यूथ बॅँकेच्या माध्यमातून रोखीने पैसे देण्याचा प्रयत्न संघाने केला; पण त्याला संस्थांचा प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ‘गोकुळ’ दूध संघाचे जिल्हा बँकेत १२० कोटी, तर इतर बँकांत १०७ कोटी अडकले आहेत.
दूध संस्थांची कोट्यवधीची बिले अडकल्याने कोंडी निर्माण झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी संघाच्यावतीने विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. ‘गोकुळ’ दुधाच्या रोख विक्रीतून जमा होणाऱ्या पैशातून संस्थांना बिलापोटी काही रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. यूथ डेव्हलपमेंट बँकेतून ही रक्कम संस्थांना देण्याची तयारी केली. दूध संकलनाच्या प्रमाणात पैसे उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, दूध संस्थांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक पातळीवर त्यांना बिलाचे पैसे मिळावेत, अशी मागणी झाल्याने जिल्हा बॅँकेच्या शाखांमार्फत पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘गोकुळ’ दूध विक्रीतून जमा होणारी रक्कम जिल्हा बॅँकेत जमा करायची आहे. त्यातून सरासरी प्रत्येक संस्थेला दहा हजार रुपये दिले जाणार असून, २० हजारांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. ज्या संस्थांचे संकलन जास्त आहे, त्यांना आठवड्यातून दोनवेळा पैसे काढण्याची मुभा दिली जाणार असून, जिल्हा बॅँकेने त्या प्रमाणात रक्कम देण्याचे मान्य केले आहे.
तीन लाखांचा लागेना मेळ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (केडीसीसी) नोटाबंदीनंतर जमा झालेल्या रकमांमध्ये दोन लाख ९८ हजार रुपयांच्या नोटांचा मेळ लागत नसल्याचे समजते. त्यामुळे मुख्यालयातून फोन करून शाखांना पैसे भरण्याचा आग्रह केला जात आहे.
पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर पुढील तीन दिवसांत जिल्हा बँकेत २५५ कोटी रुपये जमा झाले. या नोटा शाखांतून जमा झाल्यावर त्या मोजून घेऊनच मुख्यालयात आणण्यात आल्या. आता मुख्यालयात या सर्व नोटा मोजल्यानंतर त्यामध्ये दोन लाख ९८ हजार रुपयांच्या नोटा कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेला फोन करून किती नोटा दिल्या, याची छाननी केली जात आहे. आम्ही मुख्यालयाकडून कॅश घेतली आणि त्यात नंतर कमी रक्कम आली तर मुख्यालय आमची तक्रार ऐकून घेत नाही आणि आता मात्र पैसे मोजून देऊनही तुम्ही दहा-दहा हजार रुपये भरा, असा तगादा लावला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सांगली जिल्हा बँकेची ‘आयकर’ व ‘ईडी’कडून चौकशी झाल्यामुळे कोल्हापूर बँकेचे व्यवस्थापनही हादरले आहे. अशी चौकशी झाल्यास बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागतो व सभासदांतही संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे सत्ताधारी आणि अधिकारीही चिंतेत आहेत.
रोखीने अॅडव्हान्स रक्कम वाटपास संस्थांचा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा बॅँकेशी चर्चा करून प्रत्येक संस्थेला पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
- विश्वास पाटील
(अध्यक्ष, गोकुळ)
अशी मिळू शकते रक्कम
प्रतिदिनी संकलनदहा दिवसाला
लिटरमध्येमिळणारी रक्कम
१ ते ५०७ हजार
५१ ते १००९ हजार
१०१ ते १५०११ हजार
१५१ ते २००१२ हजार
२०१ ते २५०१३ हजार
२५१ ते ३००१४ हजार
३०१ ते ३५०१५ हजार
३५१ ते ४००१६ हजार
४०१ ते ४५०१७ हजार
४५१ ते ५००१८ हजार
५०१ ते ६००१९ हजार
६०१ ते ७००२० हजार
पेक्षा जास्त आठवड्यातून दोनवेळा