जिल्हा उपनिबंधकांची ‘तत्परता’

By Admin | Updated: January 16, 2015 00:26 IST2015-01-16T00:19:46+5:302015-01-16T00:26:01+5:30

मालेतील सोसायटीतील गैरव्यवहार : ‘आप’च्या पाठपुराव्यानंतर आदेश

District Deputy Registrar's 'Preparedness' | जिल्हा उपनिबंधकांची ‘तत्परता’

जिल्हा उपनिबंधकांची ‘तत्परता’

कोल्हापूर : माले येथील भैरवनाथ सेवा संस्थेत गैरव्यवहार झाल्याची व त्याची चौकशी करण्याची मागणी संचालकांनी १६ डिसेंबरलाच लेखी निवेदनाद्वारे जिल्हा उपनिबंधकांकडे केली; परंतु त्यांनी याप्रकरणी राजकीय दबावापोटी कारवाई सोडाच, चौकशी करण्यासही टाळाटाळ केल्याचे दिसत आहे. तब्बल महिन्यानंतर त्यांनी आज, गुरुवारी संस्थेचे लेखापरीक्षण करण्याचा आदेश काढला.
या संस्थेच्या संचालकांनी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची दोन-तीन वेळा भेट घेतली. त्यांनी ‘तुमचा अर्ज पन्हाळ्याच्या सहायक निबंधकांकडे पाठवला आहे, त्यांना भेटा,’ असे सांगून त्यांना तिकडे पिटाळले. संचालकांनी अनेकदा येरझाऱ्या घातल्या तरी जिल्हा उपनिबंधक दाद देईनात, म्हणून त्यांनी शेवटी ‘आप’चे जिल्हाध्यक्ष नारायण पोवार यांच्याकडे तक्रार केली. तरीही ते दाद देईनात. पोवार यांनी आज तुमच्या दारातच उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. ते विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार करण्यास गेल्याचे समजल्यावर त्यांच्या दारातून त्यांना माघारी बोलावून घेतले व सायंकाळी लेखापरीक्षण करण्याचा आदेश काढला. या संस्थेचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी पन्हाळ्याचे उपलेखापरीक्षक जे. बी. कानकेकर यांना दिली होती. त्यांनी लेखापरीक्षण तर केलेच नाही; परंतु जिल्हा उपनिबंधक कार्यालयास मात्र तसे कळविले. आता संस्थेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आल्यावर चौकशी केली असता लेखापरीक्षण झालेच नसल्याचे स्पष्ट झाले. म्हणून १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी जिल्हा विशेष लेखापरीक्षकांच्या कार्यालयातील उपलेखापरीक्षक एस. एस. बलकवडे यांच्याकडे सोपविली; परंतु गैरव्यवहार त्यानंतरही झाला आहे. त्याची सर्वंकष चौकशी व्हायला हवी होती; त्याकडे मात्र त्यांनी सोयीस्कर कानाडोळा केला आहे.
आज संस्थेचे अध्यक्ष काकासो शंकर सोळसे, संचालक नामदेव बाबूराव चौगले, संस्थापक वसंत सखाराम चौगले, बाबूराव लक्ष्मण सोळसे, तुकाराम आनंदा कोडोलीकर, हणमंत बाबूराव चौगले, रघुनाथ बापू चौगले, आदी दिवसभर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बसून होते. (उद्याच्या अंकात : कसा घडला गैरव्यवहार...?)

Web Title: District Deputy Registrar's 'Preparedness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.