नितीशच्या वारसदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी हाकलले

By Admin | Updated: October 20, 2015 00:51 IST2015-10-20T00:40:29+5:302015-10-20T00:51:00+5:30

डी. डी. गहाळ प्रकरण : सुरक्षारक्षकाकडून धक्के देत बाहेर काढण्याचा प्रकार--मस्कत प्रशासनाकडून नवीन ‘डीडी’; भारतीय दूतावासाकडे सुपूर्द

District Collector released Nitish's heirs | नितीशच्या वारसदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी हाकलले

नितीशच्या वारसदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी हाकलले

कोल्हापूर : मस्कत येथे अपघाती मृत्यू झालेल्या नितीश पाटील याच्या वारसदारांना जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पुन्हा वाईट अनुभव आला. ‘डीडी’संदर्भात विचारणा करण्यासाठी आलेल्या वारसदारांना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पोलीस सुरक्षारक्षकांना सांगून धक्के देऊन बाहेर काढायला लावले. ‘तुम जज हो क्या? हर जवाब कलेक्टरही देगा क्या? ...सबको उठाके बाहर फेंक दो! इनको अंदर डालो’ अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने उपस्थित सर्वजण अवाक् झाले. हे त्यांच्याकडून अपेक्षित नसल्याचे नितीशचे वडील तुकाराम पाटील यांनी सांगितले. या प्रकाराने वारसदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार घडला आहे.पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नितीश तुकाराम पाटील यांचा मस्कत (ओमान) येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना मस्कत प्रशासनाकडून पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाखांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेच्या गलथान कारभारामुळे गहाळ झाला आहे. नऊ महिन्यांपासून या भरपाईसाठी वारसांना येरझऱ्या माराव्या लागत आहेत. हा ‘डीडी’ पुन्हा मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. याची माहिती घेण्यासाठी नितीशचे वडील तुकाराम पाटील, चुलते परशुराम पाटील, भारत गावडे व संदेश अवडन हे सोमवारी दुपारी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांना भेटायला गेले. या ठिकाणी पवार यांनी सकारात्मक चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत वारसदारांना हे पैसे मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला. यावर संबंधितांवर कारवाईचे काय? अशी विचारणा वारसदारांनी केली. यावर ते आपल्या अधिकारात येत नाही, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्या, असे पवार यांनी सांगितले. यानंतर सर्वजण जिल्हाधिकारी सैनी यांना भेटायला त्यांच्या कार्यालयाकडे गेले. त्यांच्या दालनात प्रवेश केल्यानंतर संबंधितांनी ‘डीडी’चे पुढे काय झाले? व जबाबदार असणाऱ्यांवर पुढे काय कारवाई होणार? अशी विचारणा केली. यावर संतप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ‘तुम जज हो क्या? हर जवाब कलेक्टरही देगा क्या? सबको उठाके बाहर फेंक दो! इनको अंदर डालो’ अशी भाषा वापरल्याने उपस्थित सर्वजण अवाक् झाले. दालनाबाहेर असलेल्या पोलीस सुरक्षारक्षकांना बोलावून सर्वांना बाहेर हाकलून काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यामुळे सुरक्षारक्षकांनी धक्के देत कै. नितीशच्या वडिलांसह इतरांना बाहेर काढले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. न्याय मागण्यासाठी आलेल्यांकडून जर अशी वागणूक मिळत असेल तर आम्ही जायचे कुठे? असा प्रश्न या लोकांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)

‘डीडी’संदर्भात पुढे काय झाले? ही विचारणा करण्यासाठी गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाली आहे. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, त्यांच्याकडूनच अशी वागणूक मिळत असेल तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? हा प्रश्न आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत.
- तुकाराम पाटील, नितीशचे वडील


नितीश यांच्या वारसदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, सर्वच पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. असे असताना सोमवारी दुपारी अचानक काहीजण येऊन तुम्ही जाणीवपूर्वक ‘डीडी’ गहाळप्रकरणी दिरंगाई करत आहात, असा थेट आरोप आपल्यावर करायला लागले. एका बाजूला आपण वैयक्तिकरीत्या प्रयत्न करत असताना अशा पद्धतीने चुकीचे आरोप केल्याने त्यांना आपण येथून बाहेर जायला सांगितले. आपल्याकडून कोणतीही चूक झालेली नाही.
- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

मस्कत प्रशासनाकडून नवीन ‘डीडी’; भारतीय दूतावासाकडे सुपूर्द
कोल्हापूर : मस्कत प्रशासनाने नुकसानभरपाईचा २३ लाख ३९ हजारांचा नवीन डिमांड ड्राफ्ट (डीडी) मस्कत येथील भारतीय दूतावासाकडे सोमवारी सुपूर्द केला आहे. लवकरच तो जिल्हा प्रशासनाला मिळणार असून, रात्री उशिरा यासंदर्भात त्यांना कळविण्यात आले आहे. नितीशच्या वारसांना मस्कत प्रशासनाकडून पाठविलेला यापूर्वीचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेच्या गलथान कारभारामुळे गहाळ झाला होता. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मस्कत प्रशासन, तेथील भारतीय राजदुतावास यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. विशेषत: जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यामध्ये विशेष लक्ष घालून पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या सूचनेनुसार अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनीही संबंधितांशी नित्य संपर्क सुरू ठेवला. अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या पत्रव्यवहारानंतर शहानिशा झाल्यावर मस्कत प्रशासनाने नवीन डीडी तेथील बॅँक आॅफ बडोदाच्या माध्यमातून भारतीय दुतावासाकडे सुपूर्द केला आहे. हा डीडी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे काढण्यात आला आहे. तो दिल्ली येथील मस्कत दुतावास व बँक आॅफ बडोदा दिल्ली, मुंबई व कोल्हापूर शाखेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येईल. ही कार्यवाही लवकरच पूर्ण होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
—————————————-
अधिकारी-कर्मचारीही देणार प्रायश्चित निधी
कै. नितीश यांच्या वारसदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या दिरंगाईबद्दल अधिकारी व कर्मचारी प्रायश्चित घेणार आहेत. हा ‘डीडी’ मिळाल्यावर त्यासोबत सर्व अधिकारी व कर्मचारी आपापल्यापरीने पैसे जमा करून संबंधित वारसांना देणार आहेत.

Web Title: District Collector released Nitish's heirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.