कोल्हापूर : शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या प्रशासकीय कामकाजाची आणि दफ्तराची चौकशी करून सात दिवसात अहवाल देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना दिले आहेत.
आठवड्यापूर्वी तहसीलदार चव्हाण यांच्या नावे पंटर सुरेश खोत याला पाच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यामुळे तहसीलदार चव्हाण यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिल्हा महसूल प्रशासनाची मार्चअखेरची शासकीय कामकाजाची धांदल संपल्यानंतर त्यांच्यावरील कार्यवाहीला वेग येणार आहे.शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील जमिनीच्या एका प्रकरणात तक्रारदारांकडून पाच लाखांची लाच घेताना १८ मार्च २०२५ रोजी पंटर खोत सापडला. या प्रकरणावर मुंबईचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडली. या प्रकरणात तहसीलदार चव्हाण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. यामुळे जिल्हा महसूल प्रशासन हडबडून जागे झाले.लक्षवेधीसाठीचा अहवाल तातडीने शासनाला पाठवण्यात आला. दरम्यान, तहसीलदार चव्हाण यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीसंबंधी अनेक संघटनांनी तक्रारी केल्या आहेत. वैयक्तिक शेतीसंबंधीच्या कामकाजाच्याही तक्रारी आहेत. त्यांच्या प्रशासकीय कामकाजाची चौकशी करण्याची सूचना जिल्हाधिकारी येडगे यांना शाहूवाडीचे प्रांताधिकारी शिंगटे यांना दिली आहे. चौकशीतून नेमके काय बाहेर येणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सुरूवातीला टाळाटाळ.. पणलाचेतील वाटा मिळणारे काही जण दोषींना वाचवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. यातूनच तहसीलदारांच्या कामकाजावरील लक्षवेधी प्रश्नासंबंधीचा अहवाल देण्यास टाळाटाळ करत होते, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. मात्र, आता जिल्हाधिकारी येडगे यांनीच चौकशीचे आदेश दिल्यामुळे अहवाल द्यावा लागणार आहे.
दीर्घ रजेवर..तहसीलदार चव्हाण यांनी आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या समाज माध्यमातील पोस्टमध्ये बदलीसंबंधीचा विचार व्यक्त केला आहे. त्यांचा हा संदेश व्हायरल झाला आहे. यामुळे ते दीर्घ रजेवर जाणार की बदलीने जाणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. चव्हाण हे दीर्घ रजेवर गेल्याचीही चर्चा जिल्हा महसूल प्रशासनात जोरदारपणे सुरू आहे.