जिल्हा बँकेचे कर्मचारी नव्या लुकमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:34+5:302021-02-05T07:14:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश दिला आहे. लिपिकांपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत एकच ...

जिल्हा बँकेचे कर्मचारी नव्या लुकमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश दिला आहे. लिपिकांपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत एकच ड्रेस कोड आहे. गणवेशाचा वापर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पहिल्यांदाच दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, सलग तीन दिवस गणवेश न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन दिवस बिनपगारी केली जाणार आहे.
जिल्हा बँकेवर संचालक मंडळ आल्यापासून कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शाखांच्या वेळेसह इतर एकूणच बँकिंग कामकाजाला शिस्त लावली. त्यानंतर २०१९ ला कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड केल्याने जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची ओळख तयार झाली. त्यामुळे कामाशिवाय इतरत्र फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चाप बसला. दोन वर्षांनंतर पूर्वी दिलेल्या गणवेशामध्ये बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार लिपिक ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत फिकट गुलाबी शर्ट आणि काळी पँट, तर महिला कर्मचाऱ्यांना फिकट गुलाबी रंगाच्या साड्या व ड्रेस आहे. शिपायांच्या गणवेशाचा रंग बदलला असून पांढऱ्याऐवजी खाकी गणवेश दिले आहेत.
दीपावली बोनसमधील अर्धा टक्का कपात करून त्यातून कर्मचाऱ्यांना गणवेश दिले आहेत. गणवेशाची सक्ती असून एक दिवस गणवेश नसेल तर १०० रुपये अधिक १८ रुपये जीएसटी अशी ११८ रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर सलग तीन दिवस गणवेश नसेल तर बिनपगारी करून मुख्य कार्यालयात रवानगी केली जाणार आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी शाखाधिकारी व संबंधित विभागाच्या व्यवस्थापकांवर सोपवली आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेचे कर्मचारी रोज गणवेशात पाहावयास मिळणार आहेत.
इन्शर्टमुळे अनेकांची गोची
जिल्हा बँकेचे काही कर्मचारी हे राजकारणाशी संबंधित असल्याने त्यांना नेहमी कडकडीत ड्रेस घालण्याची सवय आहे. नवीन गणवेशाबरोबरच इन्शर्ट करण्याची सक्ती असल्याने अशा कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे.
फाेटो ओळी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेेने नवीन गणवेश दिला आहे. (फोटो-२९०१२०२१-कोल-केडीसीसी)