कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू असून बँक महिलांच्या मागे ठाम उभी असल्याचे प्रतिपादन बँकेच्या ज्येष्ठ संचालिका निवेदिता माने यांनी केले.
जिल्हा बँकेत सोमवारी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. निवेदिता माने म्हणाल्या, आर्थिक सक्षमीकरणातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बँक सदैव महिलांच्या पाठीशी असेल. बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे म्हणाल्या, उद्योग उभारणीतून स्वावलंबनासाठी महिला जर दोन पाऊल पुढे आल्या तर बँक त्यांच्या सहकार्यासाठी चार पाऊल पुढे येईल. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने म्हणाले, बचतगटांच्या मागणीनुसार उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी अल्प व्याजदरातील कर्ज देण्यास आमची बँक कटिबद्ध आहे. रोजगारनिर्मितीच्यादृष्टीने महिला बचतगटांना केडीसीसी मोबाईल बँकिंग ॲप व मायक्रो एटीएम सेंटर या सुविधा पुरवू.
जिजामाता महिला बचतगट, कबनूर, संस्कृती महिला बचतगट, प्रिन्सेस पद्माराजे महिला बचतगट, पद्माराजे उद्यान महिला बचतगट, महालक्ष्मी महिला बचतगट, राजलक्ष्मी महिला बचतगट, संघर्ष महिला बचतगटांना दप्तर वाटप केले. शेती कर्ज विभागाचे उपव्यवस्थापक अजित जाधव यांनी स्वागत केले. महिला विकास कक्षाच्या उपव्यवस्थापक रंजना स्वामी यांनी प्रास्ताविक केले. गिरीजा पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रशासन व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : जिल्हा बँकेत सोमवारी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात निवेदिता माने, उदयानी साळुंखे, ए. बी. माने आदी उपस्थित होते. (फोटो-०८०३२०२१-कोल-जिल्हा बँक)