जिल्हा बॅँकेच्या प्रचारतोफा थंडावल्या
By Admin | Updated: May 4, 2015 00:36 IST2015-05-04T00:26:16+5:302015-05-04T00:36:05+5:30
उद्या मतदान

जिल्हा बॅँकेच्या प्रचारतोफा थंडावल्या
जिल्हा बॅँकेच्या प्रचारतोफा थंडावल्या;उद्या मतदान
सांगली : गेल्या आठवडाभर धडाडणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. प्रचारसभा, बैठका, छुप्या हालचालींनी उडालेला प्रचाराचा धुरळा खाली बसला असला, तरी रात्रीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोठेही दगाफटका होऊ नये म्हणून दोन्ही पॅनेलचे नेते उमेदवारांना ‘जागते रहो’चा संदेश देत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे ही निवडणूक रंगतदार बनली आहे. आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेल आणि कॉँग्रेसप्रणीत रयत सहकार परिवर्तन पॅनेलमध्ये ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले जयंत पाटील व मदन पाटील एकत्र आले आहेत. दिग्गज नेत्यांची फौज शेतकरी सहकारी पॅनेलकडे असल्याने त्यांनी जिल्हाभर प्रचारसभा व बैठकांवर जोर दिला आहे.
दुसरीकडे मदन पाटील यांनी अचानक कॉँग्रेसचे पॅनेल सोडून शेतकरी सहकारी पॅनेलमध्ये सहभाग घेतल्याने खचलेल्या कॉँग्रेसप्रणीत पॅनेलला पतंगरावांनी आधार दिला आहे. पतंगरावांच्या सहभागामुळे ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही पॅनेलच्या नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू आहे. या जाहीर आरोप-प्रत्यारोपांना आज पूर्णविराम मिळाला.
दोन्ही पॅनेलचे नेते छुप्या प्रचारात गुंतले आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत सांगली, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांमध्ये छुप्या बैठका सुरू झाल्या होत्या. दगाफटक्याची शक्यता ज्या तालुक्यांमध्ये दिसत आहे, त्याठिकाणी अधिक सतर्कता बाळगली जात आहे. त्यामुळेच दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी उमेदवारांना आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना ‘जागते रहो’चा संदेश दिला आहे. (प्रतिनिधी)
मतमोजणी ७ रोजी
जिल्हा बॅँकेच्या १९ जागांसाठी मंगळवारी १२ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतमोजणी गुरुवारी (दि. ७) सकाळी आठ वाजल्यापासून तरुण भारत क्रीडांगणातील हॉलमध्ये दहा टेबलवर होणार आहे.