कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच चारही विषय समित्यांच्या सभापतिपदी महिलांना संधी मिळाली. मंगळवारी दुपारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ आणि रसिका पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
जाधव या आबिटकर गटाच्या असून, शिवानी भोसले या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्या आहेत. मिसाळ या चंद्रदीप नरके यांच्या कार्यकर्त्या असून, रसिका पाटील या अपक्ष असल्या तरी पालकमंत्री पाटील यांच्या समर्थक मानल्या जातात. सकाळी शासकीय विश्रामगृहावर मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये खासदार संजय मंडलिक यांनी या चारही महिला पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. या वेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते. यानंतर या चौघींचे अर्ज दाखल करण्यात आले.
दुपारी दीडनंतर पन्हाळ्यावरून महाविकास आघाडीचे सदस्य जिल्हा परिषदेत दाखल झाले. याचवेळी विरोधी सदस्यही सभागृहात आले. विरोधामध्ये कोणीच अर्ज दाखल न केल्याने दहा मिनिटांत निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि या चारही महिला सदस्यांची सभापतिपदी निवड पीठासन अधिकारी किशोर पवार यांनी घोषित केली. यानंतर कॉंग्रेसचे पक्षप्रतोद उमेश आपटे यांनी विषय समिती वाटपाची सूचना मांडली. त्याला शिवसेना गटनेते हंबीरराव पाटील यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, अरुण जाधव उपस्थित होते.
शिवाजी मोरे यांनी अभिनंदन करतानाच कालची सभा संपवताना राष्ट्रगीत न झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली. सतीश पाटील म्हणाले, आमचा सगळ्यांनी गेल्या दीड वर्षात पिट्ट्या पाडला. तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा. विजय भोजे म्हणाले, आम्हा विरोधकांना बोलायला संधी मिळू नये असे काम करा. राजवर्धन निंबाळकर म्हणाले, काल आणि आजही पदाधिकारी निवडीनंतर अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित नाही ही बाब शोभणारी नाही. या वेळी विजया पाटील, अंबरिश घाटगे, बजरंग पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. सकाळी शासकीय विश्रामगृहावर नूतन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करताना ए. वाय. पाटील, सुजित मिणचेकर, विजय देवणे, चंद्रदीप नरके, भैय्या माने उपस्थित होते.
चौकट
मी २५ वर्षे शुभेच्छाच देतोय..
ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी नूतन पदाधिकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. गेली २५ वर्षे मी इतरांचे अभिनंदन करायचे आणि शुभेच्छा देण्याचेच काम करतोय, अशी खंत बोलून दाखवली.
चौकट
विषय समिती वाटप
जयवंतराव शिंपी : कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्ध समिती
वंदना जाधव : बांधकाम आणि आरोग्य समिती
रसिका पाटील : शिक्षण आणि अर्थ
शिवानी भोसले : महिला आणि बालकल्याण
कोमल मिसाळ : समाजकल्याण समिती
चौकट
बिनविरोधसाठी यांनी केले प्रयत्न..
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीप्रमाणेच सभापती निवडही बिनविरोध व्हावी यासाठी खासदार मंडलिक यांनी ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांना फोन केला. चंद्रदीप नरके यांनी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना फोन केला. व्ही. बी. पाटील यांनीही गेल्या निवडणुकीत आपण दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यानंतर या निवडी बिनविरोध झाल्या.
१३०७२०२१ कोल झेडपी ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात कोमल मिसाळ, वंदना जाधव, रसिका पाटील आणि शिवानी भोसले यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच चार महिला सभापतींची बिनविरोध निवड झाली. (छाया आदित्य वेल्हाळ)