राज्यातील ८३५ डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:00+5:302021-05-05T04:41:00+5:30

संजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गत दोन वर्षांपासून रुग्णसेवा केली, ...

Disruption in the services of 835 doctors in the state! | राज्यातील ८३५ डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर!

राज्यातील ८३५ डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर!

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गत दोन वर्षांपासून रुग्णसेवा केली, त्याच ८३५ डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर आले आहे. कंत्राटी पद्धतीने नेमणूक असलेल्या या डॉक्टरांना कार्यमुक्त करून त्याठिकाणी ‘एमबीबीएस’ अर्हताधारकांची नेमणूक करण्याचा घाट घातला गेला आणि हे करताना त्या कंत्राटी डॉक्टरांच्या कोरोनातील योगदानाचा कसलाही विचार होत नाही, हे दुर्दैव.

राज्यात जून २०१९ पर्यंत बीएएमएस अर्हताधारक डॉक्टर हे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अस्थायी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना स्थायी पद देऊन सेवेत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त झाली. परिणामी, आरोग्य सेवा कोलमडली. या कालावधीत शासनाच्या म्हणण्यानुसार प्रयत्न करूनही रिक्तपदी एमबीबीएस अर्हताधारक उमेदवार मिळत नसल्याने अशा ठिकाणी गट अ पदावर बीएएमएस अर्हताधारकांची तदर्थ तथा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. जुलै २०१९ मध्ये या नेमणुका झाल्या. त्यानंतर मार्च २०२० पासून राज्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. या महामारीत आरोग्य यंत्रणेतील सर्वच डॉक्टरांसोबत बीएएमएस अर्हताधारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आरोग्य केंद्रांचे नियमित कामकाज सांभाळून कोरोना संशयितांचे स्वॅब टेस्टिंग, बाधित क्षेत्रात सहवासितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, वेळप्रसंगी कोरोना केअर सेंटरमध्येही रुग्णसेवा केली आहे. सध्याही बहुतांश बीएएमएस डॉक्टर्स कोरोना ड्युटीत कार्यरत आहेत. मात्र, अशातच गत चार ते पाच दिवसांपासून कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी एमबीबीएस बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देऊन कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत राज्तील याविविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८३५ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यातील काही जणांना कार्यमुक्तीचे आदेशही प्राप्त झाले असून, इतर वैद्यकीय अधिकारी नोकरी जाण्याच्या चिंतेने ग्रासले आहेत.

-------------------------------------

वेतनवाढीत केला दुजाभाव

राज्य शासनाने जून २०२० मध्ये बंधपत्रित कंत्राटी एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ केली. मात्र, समान व सारख्याच जोखमीचे काम करणाऱ्या बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनवाढ न देता उपेक्षित ठेवण्यात आले. त्यावेळी वेतनवाढीसाठी कंत्राटी डॉक्टरांना आंदोलनही करता आले असते. मात्र, कोरोनाचे गांभीर्य व कर्तव्याची जाणीव ठेवून त्यांनी त्यावेळी शासनाला वेठीस न धरता रुग्णसेवा दिली आणि आता त्यांच्याच नोकरीवर गंडांतर आले असून, ही शोकांतिका आहे.

-------------------------------------

जिल्हानिहाय कंत्राटी वैद्यकीय अधिकारी...

अहमदनगर : ५४

अकोला : १६

अमरावती : ४७

बुलडाणा : ६७

चंद्रपूर : ५७

धुळे : २७

गडचिरोली : ४

गोंदिया : १७

हिंगोली : ५

जळगाव : ६८

जालना : ५

नागपूर : १५

नांदेड : ११

नाशिक : ९०

उस्मानाबाद : ११

पालघर : २

परभणी : १

पुणे : २६

रायगड : ४४

रत्नागिरी : ५८

सांगली : ३६

सातारा : ४५

सिंधुदुर्ग : ३५

सोलापूर : ४०

ठाणे : २

वर्धा : ६

वाशिम : ८

यवतमाळ : ३८

Web Title: Disruption in the services of 835 doctors in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.